करोनाच्या भीतीमुळे संपूर्ण देशभरात २१ दिवसांकरिता पूर्णपणे संचारबंदी करण्यात आल्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) रद्द करण्यासाठी प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

‘बीसीसीआय’ने काही दिवसांपूर्वीच आयपीएलचे आयोजन १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकले होते. करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले तरच आयपीएल स्पर्धा होणे शक्य होते. पण करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सद्यस्थितीला ५००पेक्षा रुग्णांना करोनाची बाधा झाली असून १० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षांने पुढे ढकलण्यात आल्यानंतर सध्याची परिस्थिती आणखीनच खडतर होत चालली आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याने सांगितले.

किंग्स इलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया यांनी मात्र आयपीएल लांबणीवर टाकण्यात यावी, असे मत व्यक्त केले आहे. ‘‘बीसीसीआयने आयपीएल लांबणीवर टाकण्याचा विचार करावा. आयपीएल ही लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा असल्यामुळे तितक्याच जबाबदारीने आता वागण्याची गरज आहे. आयपीएलचे आयोजन हे सध्याच्या स्थितीत आमच्या आवाक्याबाहेरचे आहे. आम्हाला आयपीएल नव्हे तर लोकांचे जीव वाचवायचे आहेत,’’ असे वाडिय यांनी सांगितले.

‘‘मे महिन्यात करोनाची स्थिती जरी नियंत्रणात आली तर मैदानावर येऊन कोण खेळणार आहे? परदेशी खेळाडूंना भारतात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल का? ,’’ असे सवालही वाडिया यांनी विचारले आहेत.

बीसीसीआयचे पदाधिकारी आणि संघाचे मालक यांच्यात मंगळवारी होणारी बैठक लांबणीवर टाकण्यात आली आहे. यंदाचे आयपीएलचे पर्व २९ मार्चपासून सुरू होणार होते. पण बीसीसीआयने सुरुवातीला १५ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा स्थगित केली होती. ‘‘जर ऑलिम्पिकसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा एका वर्षांने पुढे ढकलण्यात येत असेल तर त्या तुलनेत आयपीएल ही फारच छोटी स्पर्धा आहे. त्यामुळे सध्या या स्पर्धेचे आयोजन कठीण होऊन बसले आहे. या क्षणाला केंद्र सरकार परदेशी खेळाडूंना व्हिसा देण्याच्या विचारात नाही,’’ असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. सध्या प्रत्येक समभागधारक आपले नुकसान विमा कंपन्यांकडून तसेच प्रक्षेपणकर्त्यां वाहिनीकडून वसूल करण्याच्या विचारात आहे.

या क्षणी मी काहीही सांगू शकत नाही. आयपीएल स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली, तशीच परिस्थिती आताही आमच्यासमोर आहे. गेल्या १० दिवसांत त्यात फारसा काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे आयपीएलबाबत काय होईल, याबाबत माझ्याकडे कोणतेही उत्तर नाही. लवकरच बैठक बोलावून आम्ही यासंदर्भात निर्णय घेऊ

– सौरव गांगुली, बीसीसीआयचा अध्यक्ष