ऑस्ट्रेलियन क्रिकेट म्हटलं की पहिलं नाव तोंडात येत ते सर डॉन ब्रॅडमन. ऑस्ट्रेलियाच्या या ‘डॉन’ने गोलंदाजांवर अक्षरश: सत्ता गाजवली. १९२८ ते १९४८ या २० वर्षांच्या कालावधीत ब्रॅडमन यांनी अनेक विक्रम रचले. एक तडाखेबाज फलंदाज म्हणून त्यांचा नावलौकिक होता. पण विशेष म्हणजे तडाखेबाज असूनही कामगिरीती सातत्य राखणारे असे ते खेळाडू होते. त्यांनी ५२ सामन्यात आणि ८० डावांत ६,९९६ धावा केल्या. त्यात २९ शतके आणि १३ अर्धशतके समाविष्ट आहेत. त्यांची सर्वोत्तम कामगिरी ३३४ धावांची आहे. ही कामगिरी करताना त्याने एक असा इतिहास रचला, ज्याची अजूनही कोणाला पुनरावृत्ती करता आलेली नाही.

आजच्या दिवशी (११ जुलै) १९३० साली लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना सुरू झाला होता. त्या सामन्यात सर डॉन ब्रॅडमन यांनी ४४९ चेंडूत ३३४ धावांची धमाकेदार खेळी केली. त्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात त्यांनी ४२० चेंडूत तब्बल ३०९ धावा ठोकल्या. पहिल्या सत्रात त्यांनी शतक लगावत १०५ धावा केल्या. दुसऱ्या सत्रात त्यांनी ११५ धावा केल्या तर तिसऱ्या सत्रात त्यांनी ८९ धावा जमवल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका दिवसात त्रिशतक ठोकणारा डॉन ब्रॅडमन हे एकमेव फलंदाज आहेत.

भारताचा तडाखेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग याला हा विक्रम मोडण्याची संधी होती, पण त्याला ते शक्य झाले नाही. ३ डिसेंबर २००९ ला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुसऱ्या दिवसाच्या खेळात सेहवागने २३९ चेंडूत नाबाद २८४ धावा केल्या होत्या. त्या दिवशी भारताला ९० पैकी ७९ षटकेच खेळायला मिळाली होती. पण धावगतीच्या बाबतीत सेहवाग आणि भारत ऑस्ट्रेलियात्या पुढे होते. ऑस्ट्रेलियाने १९३० मध्ये १३४ षटकात ४५८ धावा केल्या होत्या, तर भारताने २००९ मध्ये ७९ षटकात ४४३ धावा केल्या होत्या.