भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी २००७ हे वर्ष खूपच संमिश्र स्वरूपाचे होते. २००७ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. तुलनेने दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशच्या संघाने भारताला पाणी पाजले. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज झाले होते, पण त्यानंतर काही महिन्यांतच भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. याच वर्षात भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी आनंदाची गोष्ट घडली. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने जगात कोणालाही न जमलेला पराक्रम केला.

भारताचा सर्वात यशस्वी सलामीवीर सचिन तेंडुलकर याने आपल्या समृद्ध अशा २४ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम मोडीत काढले. त्यापैकी एका महत्त्वपूर्ण विक्रमाला आज १३ वर्षे पूर्ण झाली. तो विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा गाठण्याचा पराक्रम. २९ जून २००७ ला बेलफास्टच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध १५ हजार धावांचा टप्पा गाठला. असा पराक्रम सचिनच्या आधी कोणीही केला नव्हता. १० हजार धावांचा टप्पा गाठणाराही सचिनच क्रिकेटमधील पहिला फलंदाज होता. ICC ने आज ट्विट करत साऱ्यांना सचिनच्या पराक्रमाची आठवण करून दिली.

आफ्रिकेविरूद्धच्या फ्युचर कप मालिकेत सचिनने पहिल्या सामन्यात ९९ धावांची खेळी केली, पण तो सामना आफ्रिकेने चार गडी राखून जिंकला. दुसऱ्या सामन्यात मात्र सचिनने ९३ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. ओव्हर-थ्रोची धाव घेत त्याने १५ हजार धावांचा टप्पा पार केला. आफ्रिकेने त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत २२६ धावा केल्या होत्या. सलामीवीर वॅन विकने सर्वाधिक ८२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताचे सलामीवीर सचिन आणि गांगुली यांनी धडाकेबाज शतकी सलामी दिली होती. गांगुली ४२ धावांवर बाद झाला, पण सचिनच्या ९३ आणि युवराजच्या नाबाद ४९ धावांच्या जोरावर भारताने सामना जिंकला.