भारतीय क्रिकेटसाठी २५ ऑगस्ट २०१९ हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. याच दिवशी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली होती. जसप्रीत बुमराहचे ५, इशांत शर्माचे ३ आणि मोहम्मद शमीच्या २ बळींच्या मदतीने भारताने विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये गुंडाळला होता. त्यामुळे भारताला पहिल्या कसोटीत तब्बल ३१८ धावांनी मोठा मिळाला.

परदेशात खेळलेल्या कसोटी समान्यांपैकी हा भारताचा सर्वात मोठा विजय होता. याचसोबत जसप्रीत बुमराहनेदेखील या सामन्याच्या दुसऱ्या डावात दमदार कामगिरी केली होती. त्याने ८ षटकांपैकी ४ षटके निर्धाव टाकली होती. विशेष म्हणजे त्याने केवळ ७ धावा देत ५ बळी टिपले होते.

सामन्यात भारताचा पहिला डाव २९७ धावांत आटोपला होता, तर वेस्ट इंडिजचा पहिला डाव २२२ धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने ७ बाद ३४३ धावांवर डाव घोषित केला आणि वेस्ट इंडिजपुढे ४१७ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची दाणादाण उडाली. जसप्रीत बुमराहने टिपलेल्या ७ धावांत ५ बळींच्या जोरावर भारताने विंडीजची अवस्था ९ बाद ५० अशी केली होती. विंडीजने १० व्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी केली, पण केमार रोचला माघारी पाठवत इशांतने भारताला परदेशी भूमीवरील सर्वात मोठा विजय मिळवून दिला. पहिल्या डावात ८१ तर दुसऱ्या डावात १०२ धावांची खेळी करणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.