इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने लिहिलेल्या पुस्तकात २०१९ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड-भारत साखळी सामन्याबाबत उल्लेख केला आहे. या सामन्यातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या तिघांच्या फलंदाजीबद्दल त्याने संशय व्यक्त केला. त्या सामन्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. २०१९ च्या विश्वचषकात ३० जूनला भारत-इंग्लंड सामना रंगला होता. त्या सामन्यात इंग्लंडने ७ गडी गमावत ३३७ धावा केल्या होत्या, पण भारतीय संघाला मात्र हे आव्हान पेलवलं नाही. भारताला त्या सामन्यात ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यानंतर, उपांत्य फेरीत पाकिस्तानशी सामना होऊ नये व पुढील सामन्यात पाकिस्तानचे रन रेटचे गणित बिघडावे यासाठी भारत इंग्लंडविरुद्धचा सामना हरला, अशी चर्चा सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली होती.

इंग्लंडच्या संघात असणाऱ्या बेन स्टोक्सने याबाबत आपल्या पुस्तकात मत व्यक्त केले. त्यात त्याने रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या तिघांच्या त्या दिवशीच्या फलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्यावेळी धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला, त्यावेळी भारताला ११ षटकांमध्ये ११२ धावा हव्या होत्या. धोनी विचित्र पद्धतीने फलंदाजी करत होता. भारत अखेरच्या दोन षटकांतही जिंकू शकला असता, पण धोनी आणि केदार जाधव खेळत असताना ते जिंकण्यासाठी खेळत आहेत असं अजिबात वाटत नव्हतं”, असे स्टोक्सने On Fire या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. “सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनी संघाला बॅकफूटवर ढकललं. आमच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याची जराही तसदी त्यांनी घेतली नाही”, असेही त्याने लिहिले आहे.

बेन स्टोक्स

स्टोक्स या पुस्तकानंतर पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी भारतीय संघ मुद्दाम इंग्लंडशी पराभूत झाला, असे आरोप करायला सुरूवात केली. पाकिस्तानचा माजी गोलंदाज सिकंदर बख्त याने भारत इंग्लंडशी मुद्दाम हारल्याचा दावा स्टोक्सने आपल्या पुस्तकात केला असल्याचे एका चॅट शो मध्ये म्हटले. त्यावर खुद्द स्टोक्सने ट्विट करत, ‘भारत मुद्दाम हरला असं म्हटलेलं नाही’, असं स्पष्टीकरण दिलं. तरीदेखील त्यानंतर माजी कर्णधार वकार युनिस आणि माजी खेळाडू अब्दुल रझाक यांनी भारतीय संघातील खेळाडू मुद्दाम इंग्लंडपुढे नतमस्तक झाले असा दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर भारतीय क्रिकेट जाणकार आणि चाहते यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.

अशी होती रोहित, विराट आणि धोनीच्या खेळी

रोहित शर्मा

रोहितने त्या सामन्यात १०९ चेंडूत १०२ धावा केल्या होत्या. त्यात १५ चौकारांचा समावेश होता. विराटने ७६ चेंडूत ६६ धावा केल्या होत्या. त्यात ७ चौकार समाविष्ट होते. तर धोनीने ३१ चेंडूत ४२ धावा केल्या होत्या. त्यात ४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. तसेच शेवटच्या पाच षटकात भारताला केवळ २० एकेरी धावा, ३ चौकार आणि १ षटकार अशा धावा जमवता आल्या. तर ७ चेंडू हे निर्धाव राहिले. त्यामुळे भारताला ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.