पाकिस्तानचा स्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदीनं नैरोबीच्या मैदानात आजच्याच दिवशी क्रिकेट कारकिर्दीतील लक्षवेधी खेळी केली होती. ४ ऑक्टोबर १९९६ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ३७ चेंडूत शतक साजरे केले होते. श्रीलंकेविरुद्ध केलेली वादळी खेळी त्याच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण आहे. आफ्रिदीने या सामन्यात ४० चेंडूत १०२ धावा केल्या होत्या. यामध्ये ११ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. या अविस्मरणीय खेळीशिवाय शाहिद आफ्रिदीच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रमही आहे. त्याने एकूण ३५१ षटकार ठोकले आहेत.

आफ्रिदीचा हा विक्रम जवळपास १८ वर्षे अबाधित होता. न्यूझीलंडच्या सीजे अॅंडरसनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ३६ चेंडूत शतकी खेळी करुन त्याचा विक्रम मोडीत काढला. सध्याच्या घडीला सर्वाधिक जलद शतक करण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावे आहे. त्याने ३१ चेंडूत शतकी खेळी केली आहे.

विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्ध नैरोबीच्या मैदानात आफ्रिदीने केलेली शतकी खेळी सचिनच्या बॅटने केली होती. खुद्द आफ्रिदीने एका मुलाखतीमध्ये याविषयी सांगितले होते. नैरोबीतील नेट प्रॅक्टिसदरम्यान वकार युनूसने एक बॅट दिली. ही बॅट महान खेळाडूची आहे, एकदा खेळून पाहा, असे त्याने सांगितले. त्याच्या सल्ल्यानंतर मी ही बॅट घेऊन मैदानात उतरलो. तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला, असे आफ्रिदी म्हणाला होता. आफ्रिदीने पाकिस्तानकडून तब्बल ३९८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात ६ शतकं आणि ३९ अर्धशतकासह त्यानं २३.५८ च्या सरासरीनं ८०६४ धावा केल्या आहेत.