दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिये हा २००२ साली आजच्या दिवशी विमान अपघातात मरण पावला. मॅच फिक्सिंग आणि लाचखोरीचे आरोप झाल्याने १९९९ च्या विश्वचषकानंतर तो क्रिकेटपासून काहीसा दूरच होता. त्यानंतर वयाच्या ३२ व्या वर्षी विमान दुर्घटनेत त्याचा १ जून २००२ ला मृत्यू झाला. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना ३६ पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या, तसेच काही वेळा त्याने मध्यमगती गोलंदाजीदेखील केली.

हॅन्सी क्रोनिये

आफ्रिकेच्या ब्लोमफोंटीनमध्ये जन्मलेल्या क्रोनियेच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया वगळता इतर सर्व क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख संघांविरुद्ध मालिकांमध्ये विजय संपादन केला. क्रोनिये नेतृत्व केलेल्या ५३ कसोटी सामन्यांपैकी आफ्रिकेने २७ सामन्यात विजय मिळवला आणि केवळ ११ सामने गमावले. परंतु दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्याची इच्छा अपूर्ण राहिली.

“हॅन्सी क्रोनिये हा एक उत्तम कर्णधार होता. जेव्हा मी आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले, तेव्हा तो माझ्यासाठी प्रेरणास्थान होता. त्याने मला क्रिकेटमध्ये आत्मविश्वास दिला. त्याचा आदर करत नाही असा कोणताही क्रिकेटपटू सापडणे शक्य नाही”, अशा शब्दात क्रोनियेच्या अपघाती मृत्यूनंतर शोकसभेत त्याचा सहकरी आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याची दिली होती कबुली

क्रोनियेच्या मृत्यूच्या दोन वर्षापूर्वी, मॅच फिक्स करण्यासाठी त्याने एका भारतीय बुकीकडून लाच घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे क्रीडा विश्व हादरले होते. दिल्ली पोलीस एका खंडणी प्रकरणाची चौकशी करत होते, तेव्हा योगायोगाने त्यांना एक रेकॉर्डिंग असलेली टेप मिळाली आणि त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. सुरूवातीला फिक्सिंगचे आरोप क्रोनियेने नाकारले. पण अखेर दक्षिण आफ्रिकेतील चौकशी आयोगापुढे त्याने या प्रकरणातील आपल्या सहभागाची कबुली दिली. त्यानंतर त्याच्यावर आजीवन क्रिकेटबंदी घालण्यात आली होती. परंतु, दोन वर्षानंतर त्याचा विमान अपघातात मृत्यू झाला.