इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड… सुपर ओव्हरचा थरार… सुपर ओव्हरही ‘टाय’…….. आता पुढे काय???? World Cup 2019 च्या फायनलमध्ये हा प्रश्न साऱ्यांना पडला होता. पण त्यावेळी ICCचा एक नियम इंग्लंडच्या मदतीला धावून आला आणि जगाला नवा विश्वविजेता मिळाला. १४ जुलै २०१९ ला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीतच सुटला. त्यामुळे मूळ सामन्यात लगावण्यात आलेल्या सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

असा रंगला होता सामना-

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

२४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात अत्यंत खराब झाली. बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर (५९) बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्याने नाबाद ८४ धावा केल्या. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला. त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

काय झाला होता वाद?

विश्वचषकाच्या अंतिम फेरीसारख्या मोठ्या सामन्यात चौकार-षटकारांचे निकष लावणे हे कितपत योग्य? असा सवाल चाहते आणि क्रिकेट जाणकारांनी केला होता. सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती तर विजेतेपद विभागून देणं आवश्यक होतं असेही काही लोकांचे मत पडले. मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर तो नियम बदलण्यात आला. ICC च्या स्पर्धांमध्ये सामना अनिर्णित राहिल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावण्यात येण्याचा नियम कायम असणार आहे. साखळी फेरीत जर सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला, तर तो अधिकृतरित्या अनिर्णित घोषित केला जाईल. पण बाद फेरीत सुपर ओव्हरमध्ये सामना अनिर्णित राहिला, तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, असा नवा नियम ICC ने केला.