आज भारतासह जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशभरात महिला दिनानिमीत्त खास कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातंय. मग या खास दिवशी भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली कसा मागे राहु शकतो?? नुकताच लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या विराट कोहलीने आपली पत्नी अनुष्कासाठी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक खास संदेश दिला आहे. विराटच्या या व्हिडीओला सध्या ट्विटरवर चांगली पसंती मिळत आहे.

“स्त्री आणि पुरुष कधीच समान नसतात. पण तुझ्यासारखे गुण माझ्यात यावे असं मला नेहमी वाटत असतं. आजच्या जगातल्या स्त्रीया या पुरुषांपेक्षा कित्येक पटीने पुढे आहेत. घरगुती हिंसाचार, लैंगिक अत्याचार यासारख्या अनेक समस्यांना तोंड देऊनही तुम्ही प्रत्येक गोष्टीत आपलं कर्तृत्व सिद्ध करत आला आहात. तरीही आपल्याला वाटलं की स्त्री आणि पुरुष समान आहेत. माझ्या मते आजची स्त्री ही परुषाच्या कित्येक पटीने पुढे आहे.” पत्नी अनुष्का आणि जगभरातील सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देताना विराटने हा खास संदेश आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

सध्या भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत तिरंगी मालिका खेळतो आहे. मात्र विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि अन्य महत्वाच्या खेळाडूंना या मालिकेत विश्रांती देण्यात आलेली आहे. याआधी झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. कसोटी मालिकेत २-१ असा पराभव स्विकारावा लागला असला तरीही वन-डे आणि टी-२० मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवलं होतं.