News Flash

एक औपचारिक दिवस

सामन्याच्या चौथ्या दिवशी मुंबईने बडोद्यावर फॉलोऑन न लादता पूर्ण दिवस फलंदाजी केल्याने सामन्याचा पाचवा दिवस फक्त औपचारीकता ठरला. फॉलोऑन लादला नसला तरी विजयासाठी कोणतेही प्रयत्न

| January 11, 2013 03:43 am

मुंबईचा संघ उपांत्य फेरीत ; सेनादलाशी दोन हात करणार
कौस्तुभ पवारचे शतक; मुंबईचा दुसरा डाव २९५ धावांवर घोषित
बडोदा दुसरा डाव २ बाद  १३७; आदित्य वाघमोडेचे अर्धशतक
सामन्याच्या चौथ्या दिवशी मुंबईने बडोद्यावर फॉलोऑन न लादता पूर्ण दिवस फलंदाजी केल्याने सामन्याचा पाचवा दिवस फक्त औपचारीकता ठरला. फॉलोऑन लादला नसला तरी विजयासाठी कोणतेही प्रयत्न यावेळी मुंबईने केले नाहीत. कौस्तुभ पवारच्या शतकाच्या जोरावर मुंबईने दुसरा डाव २९५ धावांवर घोषित करत बडोद्यापुढे ६७० धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले. बडोद्याच्या हातात काहीच नसल्याने त्यांनी मुंबईच्या औपचारीकतेच्या नाटय़ाला ‘मम’ म्हणण्याची भूमिका पार पाडली. सामन्याचा निकाल लागणार नाही, हे समजल्यावर दोन्ही संघांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. बडोद्याने दुसऱ्या डावात ३ बळींच्या जोरावर १३७ धावा केल्या. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या वसिम जाफरला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मुंबईने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई करत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. उपांत्य फेरीत मुंबईला सेनादलाशी दोन हात करावे लागणार असून हा सामना १६ ते २० जानेवारी दरम्यान पालम येथे होणार आहे.
पाचव्या दिवशी मुंबईचा सुरुवात चांगली झाली नाही. बुधवारी ६५ धावांची खेळी साकारणाऱ्या हिकेन शाहला (७९) गुरुवारी १४ धावांची भर घातला आली. हिकेननंतर फलंदाजीला आला तो सामन्याचे मुख्य आकर्षण ठरलेला सचिन तेंडुलकर. पहिल्या डावात शतक झळकावल्याने दुसऱ्या डावातही सचिनकडून मोठय़ा अपेक्षा होत्या, पण फक्त ९ धावा करून तो तंबूत परतला. ‘लाँग ऑन’ ला षटकार ठोकून सचिनने चांगली सुरुवात केली खरी, पण भार्गव भट्टच्या अप्रतिम चेंडूवर सचिन बाद झाला.
सामन्यात तीन झेल सोडणाऱ्या युसूफ पठाणने त्याचा यशस्वी झेल घेतला. मुंबईचे एकामागून एक फलंदाज तंबूत परतत असताना कौस्तुभने दुसरी बाजू खंबीरपणे लाऊन धरत कारकीर्दीतले दुसरे शतक झळकावले. शतक झळकावल्यावर मोठा फटका मारण्याच्या नादात कौस्तुभ यष्टीचीत होऊन तंबूत परतला. बाद होण्यापूर्वी कौस्तुभने १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११५ धावांची खेळी साकारली. कौस्तुभ बाद झाल्यानंतर उपहाराच्या वेळी मुंबईने २९५ धावांवर आपला डाव घोषित करत बडोद्यापुढे ६७० धावांचे आव्हान ठेवले.
दोन सत्रांमध्ये ६७० धावा अशक्यप्राय असल्याची कल्पना साऱ्यांनाच होती, पण बडोद्याच्या सलामीवीरांनी शतकी सलामी देत चांगली सुरुवात केली. आदित्य वाघमोडेने १२ चौकारांच्या जोरावर ६० धावांची खेळी साकारली, तर सौरभ वाकस्करने पाच चौकारांच्या जोरावर ४२ धावांची खेळी साकारली. या दोघांनी यावेळी १०१ धावांची सलामी दिली. सामन्याचा निकाल लागू शकत नाही हे समजल्यावर दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी दोन्ही संघांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी अंबाती रायुडू (नाबाद १९) आणि केदार देवधर (नाबाद ६) खेळत होते. दमदार सलामीच्या जोरावर बडोद्याची दुसऱ्या डावात खेळ थांबला तेव्हा  ३ बाद १३७ अशी अवस्था होती.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : ६४५ आणि ६ बाद २९५ (डाव घोषित) (कौस्तुभ पवार ११५, हिकेन शाह ७९; भार्गव भट्ट ३/ १०६)
बडोदा : २७१ आणि ३ बाद १३७ (आदित्य वाघमोडे ६०; अंकित चव्हाण २/४२)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 3:43 am

Web Title: one formal day
टॅग : Sports
Next Stories
1 खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा आजपासून
2 पुण्याच्या सतेज मंडळाची विजयी सलामी
3 रणजी राऊंड-अप- पुजाराचे त्रिशतक, सौराष्ट्र उपांत्य फेरीत
Just Now!
X