पाकिस्तानविरुद्ध भारताने पुरुष हॉकीत मिळविलेल्या सुवर्णपदकाने मला बँकॉक येथेच नेले. १९९८ मध्ये आम्ही आशियाई स्पर्धा जिंकली, त्या वेळीही आम्ही पेनल्टी स्ट्रोक्सद्वारा विजय मिळविला होता. त्याची आठवण माझ्यासाठी अजूनही ताजीच आहे असे भारताचे माजी गोलरक्षक आशीष बल्लाळ यांनी सांगितले. बँकॉक येथे १६ वर्षांपूर्वी झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने अजिंक्यपदावर आपली मोहोर नोंदविली. त्या वेळी अंतिम सामन्यात भारताने बल्लाळच्या अभेद्य गोलरक्षणाच्या जोरावरच कोरियास पराभूत केले होते. कोरियात भारताने यंदा मिळविलेल्या सुवर्णपदकातही गोलरक्षक श्रीजेश याने केलेल्या भक्कम गोलरक्षणाचा सिंहाचा वाटा होता. भारतीय हॉकी संघाविषयी व भारताच्या हॉकी क्षेत्राविषयी बल्लाळ याच्याशी केलेली ही बातचीत..  
*भारतीय संघाच्या कामगिरीबाबत तुम्हाला काय वाटते?
भारताने सुवर्णपदक मिळविले, त्याबद्दल मला खूप कौतुक आहे. आम्ही १९९८ मध्ये हॉकीत तिरंगा फडकाविला होता. त्यानंतर सोन्याचा दिवस पाहण्यासाठी एवढे दिवस भारतास पाहावे लागले आहेत. मात्र अंतिम सामन्यात आमच्या संघाने किमान तीन ते चार गोलांच्या फरकाने विजय मिळवायला पाहिजे होता. हॉकीच्या नवीन स्वरुपाबाबत पाकिस्तानचे खेळाडू फारसे अनुभवी नाहीत. आपल्या खेळाडूंना हॉकी इंडिया लीगमध्ये या स्वरुपाच्या सामन्यांचा भरपूर अनुभव मिळाला. त्याचा फायदा त्यांना या स्पर्धेसाठी उपयुक्त ठरला. त्यांच्या खेळात अधिक आत्मविश्वास दिसून आला.
*तुम्ही मिळविलेल्या सुवर्णपदकाच्या तुलनेत यंदाची कामगिरी कशी होती?
आमच्या वेळी हल्लीच्या एवढय़ा सुविधा व सवलती उपलब्ध नव्हत्या. हल्लीच्या खेळाडूंना दरवर्षी किमान चार ते पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळते. आंतरराष्ट्रीय लीगमुळे परदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभवही मिळतो. ही गोष्ट लक्षात घेतली तर यंदा भारताने या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवायला पाहिजे होते. एक मात्र नक्की की गेल्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास कोरियातील सुवर्णपदक खरोखरीच कौतुकास्पद आहे.
*रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी कशी राहील ?
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणे ही खूपच अवघड कामगिरी आहे. मात्र आपण पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. तेथे ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, जर्मनी, बेल्जियम आदी बलाढय़ संघांचे आव्हान असणार आहे. त्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला पर्यायी खेळाडूची व्यवस्था राहील यादृष्टीने दुसरी फळीही भक्कम करण्याची गरज आहे. आशियाई स्पर्धेत केवळ श्रीजेश या एकाच गोलरक्षकास भारताची भिस्त होती. असे धोरण कधी कधी संघास मातीत घालू शकते. हा खेळाडू जखमी झाला असता तर ती गोष्ट भारतास किती महागात ठरली असती याचा विचार कोणीही केला नाही याचेच आश्चर्य वाटते. संघातील कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून राहणे चुकीचे असते.
*संघाच्या विजेतेपदात प्रशिक्षक टेरी वॉल्श यांचा किती वाटा आहे?
आपल्या विजेतेपदात संघातील प्रत्येक खेळाडूचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांनी उत्कृष्ट सांघिक समन्वय दाखविला. श्रीजेश याने केलेल्या भक्कम गोलरक्षणामुळेच हे स्वप्न आपण साकार करू शकलो. वॉल्श यांनीही चांगले मार्गदर्शन केले आहे यात शंकाच नाही. मात्र अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी केलेल्या चुका भारताच्या पथ्यावर पडल्या.
*उच्च कामगिरी संचालक रोलँन्ट ओल्ट्समनविषयी तुम्ही समाधानी आहात काय ?
अजिबात नाही. संघाने मिळविलेल्या सुवर्णपदकात त्यांचा फारसा वाटा नाही. हॉकी हा खेळ खेडोपाडी नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र ही जबाबदारी त्यांनी चांगल्या रीतीने पार पाडलेली नाही. देशाच्या तळागाळात या खेळाच्या योजनांची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. देशात अनेक ठिकाणी हॉकीच्या अकादमी आहेत. मात्र या अकादमींचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला नाही. देशातील प्रत्येक अकादमीतून नैपुण्यवान खेळाडूंची पारख करून त्यांचा विकास कसा करता येईल यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपण ओल्ट्समन यांच्यावर दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करीत आहोत. त्या गुंतवणुकीचा खरोखरीच फायदा होत आहे की नाही, याचा बारकाईने विचार करण्याची वेळ आली आहे. ओल्ट्समन यांच्याइतकेच आपल्याकडे कुशल मार्गदर्शक आहेत, मात्र त्यांचा उपयोग अपेक्षेइतका केला जात नाही. परदेशी प्रशिक्षकांइतके अव्वल दर्जाचे प्रशिक्षक आपल्याकडे असतानाही त्यांच्यावर अन्यायच केला जात आहे. परदेशी प्रशिक्षकाचे दरमहा लक्षावधी वेतन मोजतो, तर भारतीय प्रशिक्षकास दरमहा ३० ते ५० हजार वेतन दिले जाते अशी तफावत करणे अयोग्य आहे.