विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१९ विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. साखळी फेरीत इंग्लंडविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता भारतीय खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी केली. रोहित शर्माने तर या स्पर्धेत ५ शतकं झळकावली. परंतू उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि भारताचं स्पर्धेतं आव्हान संपुष्टात आलं. रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली हे बिनीचे शिलेदार या सामन्यात स्वस्तात माघारी परतले.
२४० धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी सपशेल अपयशी ठरली. परंतू मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने फटकेबाजी करत भारताचं आव्हान जिवंत ठेवलं होतं. धोनीनेही या सामन्यात चांगला खेळ केला, पण गरजेच्या वेळी फटकेबाजी न करता एकेरी-दुहेरी धावा घेण्याकडे धोनीने भर दिल्यामुळे भारतावरचं दडपण वाढलं. त्यातचं गप्टीलने केलेल्या भन्नाट थ्रो-मुळे धोनी माघारी परतला आणि भारताच्या उरल्या-सुरल्या आशा संपुष्टात आल्या. रविंद्र जाडेजाने आपल्या सोशल मीडिया काऊंटवर या सामन्याबद्दल लिहीताना…”आम्ही खूप प्रयत्न केला पण तरीही अपयशी ठरलो. आमच्यासाठी सगळ्यात वाईट दिवस”, या शब्दांत आपल्या भावना मांडल्या आहेत.
या सामन्यात ऋषभ पंत, हार्दिक पांड्या यांनीही चांगला हातभार लावला. पण संघाला विजय मिळवून देईल अशी खेळी ते करु शकले नाहीत. भारतावर मात करुन न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत निर्धारित वेळेत आणि सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंडला सर्वाधिक चौकारांच्या निकषावर विजेतेपद बहाल करण्यात आलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2020 3:57 pm