जेव्हापासून विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून त्याच्याविषयी अनेक खुलासे केले जात आहेत. यात आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर (WTC) विराट कोहलीने केलेल्या वक्तव्यानंतर एका वरिष्ठ क्रिकेटपटूने बीसीसीआयकडे तक्रार केली.

भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आणि यानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला, ”खेळाडूंमध्ये तो जिंकण्यासाठीचा हेतू आणि आत्मा नव्हता.” काही खेळाडू विराटच्या वक्तव्यावर खूश नव्हते. स्पोर्ट्सकीडा आणि एनडीटीव्ही यांच्या वृत्तानुसार एका वरिष्ठ क्रिकेटपटूने याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केली होती.

एका सूत्राने द टेलिग्राफ या वृत्तसंस्थेला सांगितले, की अनेक खेळाडू विराट कोहलीच्या अ‍ॅटिट्यूडबाबत खुश नाहीत. सूत्राने सांगितले, “विराट कोहली आपले संतुलन गमावत आहे. त्याने आपला आदर गमावला आहे आणि काही खेळाडूंना त्याचा अ‍ॅटिट्यूड आवडत नाही. तो आता प्रेरणादायी राहिलेला नाही आणि खेळाडू त्याला योग्य तो सन्मान देत नाहीत.”

हेही वाचा – “कर्णधारपद सोडण्यासाठी विराटवर कोणताही दबाव नव्हता”, भारताच्या माजी क्रिकेटपटूनं केलं स्पष्ट!

एवढेच नव्हे, तर विराट कोहलीने सरावादरम्यान प्रशिक्षकावर आपला रागही व्यक्त केला होता. जेव्हा प्रशिक्षक त्याला त्याच्या फलंदाजीबद्दल सांगत होते, तेव्हा तो संतापला आणि म्हणाला की मला गोंधळात टाकू नका.

वनडे संघाबाबत विराटची सूचना

रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवावे, अशी सूचना कोहलीने केली होती. आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर या क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा विराटने गुरुवारी केली. या पार्श्वभूमीवर टी-२० संघाचे कर्णधारपद रोहितकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ३४ वर्षीय रोहितवरील अन्य दडपण कमी करण्यासाठी वनडे संघाचे उपकर्णधारपद के. एल. राहुलकडे सोपवावे आणि टी-२० संघाचे ऋषभ पंतकडे देण्यात यावे अशा सूचना विराटने निवड समितीला दिल्याचे समजते. परंतु वनडे कर्णधारपद २०२३ पर्यंत सुरक्षित राहावे, याकरिता उत्तराधिकारी नसावा, याच हेतूने विराटने हा प्रस्ताव सादर केल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.