करोना संकटाविषयी सौरव गांगुलीचे मनोगत

 नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या करोनाच्या संकटाशी दोन हात करत आहे. करोनामुळे जगभरातील क्रीडाविश्वाला मोठा फटका बसला असताना क्रिकेट खेळ पूर्णपणे ठप्प झाला आहे. ही सद्य:परिस्थिती म्हणजे धोकादायक खेळपट्टीवर कसोटी क्रिकेट खेळण्यासारखे आहे, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘‘खेळपट्टी अतिधोकादायक बनली असताना त्यावर कसोटी क्रिकेट खेळणे जीवावर बेतू शकते, तशीच ही परिस्थिती आहे. चेंडू उसळी आणि वळणे घेत आहे. खेळपट्टीकडून गोलंदाजाला भरपूर साथ मिळत आहे. त्यामुळे फलंदाजाला चुका करण्याची एकही संधी नाही. फलंदाजाने धावा करण्याबरोबरच नाहक आपला बळी गमवू नये आणि संघाला सामना जिंकून देणे गरजेचे आहे. अशा शब्दांत करोनाविषयीच्या सद्यस्थितीचे वर्णन करता येईल,’’ असे सौरव गांगुलीने सांगितले.

‘१०० हवर्स १०० स्टार्स’ या कार्यक्रमात गांगुली म्हणाला की, ‘‘सध्याची परिस्थिती फारच गंभीर असली तरी आपण सर्वानी एकत्र येऊन हा सामना जिंकू, अशी आशा आहे. करोनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत, हे खूपच दुर्दैवी आहे. करोनाग्रस्तांचा आकडा पाहून मी खूपच निराश होतो. करोना संकटावर मात कशी करायची, हेच समजत नाहीये. हे वातावरण फक्त भारतात नसून संपूर्ण जगभरात आहे. त्यामुळे भीतीत आणखीनच भर पडत आहे. हा विषाणू कसा, कुठून आणि केव्हा आला, हेच समजायला मार्ग नाही. या संकटाचा सामना करायला कुणीही सज्ज नव्हते,’’ असे गांगुली म्हणाला.

‘‘काही लोक माझ्या घराजवळ येऊन दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ मागतात, तेव्हा भीती आणखीन वाढते. कारण करोनाचा फटका सर्वसामान्य जनतेला सर्वाधिक प्रमाणात बसला आहे. हे संकट लवकरात लवकर संपावे, अशीच माझी इच्छा आहे. आयुष्यात कठीण परिस्थितीचा सामना कसा करावयाचा, हे मला क्रिकेटने शिकवले. प्रत्येक क्षणी सजग कसे राहावे, हेसुद्धा क्रिकेटकडूनच शिकलो,’’ असेही गांगुलीने सांगितले.

कठीण वातावरणात सकारात्मक कसा राहतो, याविषयी गांगुली म्हणाला, ‘‘खऱ्या आयुष्यात, दडपणाच्या परिस्थितीचा सामना कसा करावयाचा, हे क्रिकेटने मला शिकवले. टाळेबंदीला एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला असून मी कुटुंबासह अधिक वेळ व्यतीत करत आहे. याआधी मला इतका वेळ कधीच मिळाला नव्हता. गेल्या ३०-३२ दिवसांपासून मी पत्नी, मुलगी, आई आणि भावासोबत वेळ घालवत आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद मी लुटत आहे.’’