सुप्रिया दाबके

करोना विषाणू संसर्गाच्या काळात ऑनलाइन क्रीडा स्पर्धा ही काळाची गरज बनली आहे. बुद्धिबळ आणि नेमबाजीच्या आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत स्पर्धा सातत्याने ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. वुशू, कॅरम आदी खेळांमध्येही ऑनलाइनचे प्रयोग झाले. या स्थितीत ऑनलाइन क्रीडा स्पर्धा आयोजित करणे ही काळाची गरज बनली आहे.

करोना विषाणू संसर्गातून सावरण्यासाठी किती काळ लागेल, हे कोणीच सांगू शकत नाही. कोरियात बेसबॉल आणि फुटबॉल लीग सुरू झाल्या आहेत. काही फुटबॉल लीगच्या धोरणात्मक पुनरागमनाच्या हालचाली सुरू आहेत; परंतु तरीही मैदानावरील क्रीडा स्पर्धावरील करोनाची दहशत कायम आहे. याचप्रमाणे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवायचे, की काही मोजक्याच प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा, याविषयीची चर्चादेखील सुरू आहे. फुटबॉल जगतात युरोपियन देशांमध्ये तेथे खेळणाऱ्या ला-लिगा, बुंडेसलिगा येथील फुटबॉलपटूंनी सामाजिक अंतर राखत फुटबॉल सरावालाही सुरुवात केली आहे. जर्मनीतील बुंडेसलिगासाठी तर त्या देशाने ५१ पानांची आचारसंहिता तयार केली आहे. फुटबॉल हंगामातील उर्वरित सामने न झाल्यास मोठय़ा आर्थिक नुकसानीला फुटबॉलविश्वाला सामोरे जावे लागणार आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. क्रिकेटच्या बाबतीत सांगायचे तर इंग्लंडमध्येही पुन्हा खेळाडूंच्या सरावाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतील, याची शाश्वती देणे कठीण आहे; पण सध्याच्या काळात ऑनलाइन क्रीडा स्पर्धा हाच काही खेळांसाठी तरी उत्तम पर्याय ठरत आहे.

जिम्नॅस्टिक्स, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंगप्रमाणे सादरीकरणावर आधारित अनेक खेळांच्या ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा होऊ शकतात. टाळेबंदी सुरू झाल्यापासून जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षक त्यांच्या खेळाडूंकडून ऑनलाइन सराव करून घेत आहेत. व्यायामशाळा आणि जिम बंद असल्यामुळे शरीरसौष्ठव किंवा वजन उचलण्याशी निगडित क्रीडापटूंचा सराव स्थगित झाला आहे.  हे क्रीडापटू उपलब्ध साहित्यानिशी घरगुती व्यायाम करीत आहेत. क्रीडापटू, मार्गदर्शक यांच्यासारख्या अनेकांना सध्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या खेळांमधील ऑनलाइन स्पर्धा झाली तर अर्थकारण सुरू राहील.

वुशू खेळाच्या ऑनलाइन स्पर्धादेखील नुकत्याच झाल्या. त्याला चांगला प्रतिसादही लाभला. जागतिक स्तराचा विचार करायचा झाल्यास महिलांची आणि पुरुषांची पोलवॉल्ट स्पर्धाही युरोपियन देशांमध्ये नुकतीच ऑनलाइन पद्धतीने पार पडली. अर्ध्या तासात चार मीटर अंतरावरून अधिकाधिक झेप घेण्याची ही स्पर्धा होती. बुद्धिबळात नुकतीच ऑनलाइन नेशन्स चषक स्पर्धा झाली. त्यात चीन विजेता ठरला. विश्वविजेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने पुन्हा नवीन स्पर्धा प्रायोजित केली आहे. ही ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा १० लाख डॉलरची आहे. अर्थातच त्यात भारतीय खेळाडूंचा सहभाग नाही. भारतातही विविध राज्यांमध्ये ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धाचे आयोजन होत आहे. करोनाविरुद्धच्या लढय़ासाठी आर्थिक योगदान म्हणूनही अनेक बुद्धिबळपटूंकडून ऑनलाइन मदतनिधी सामने खेळवण्यात येत आहेत. माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक शिमॉन शरीफ यांच्या पुढाकाराने एका महिन्याच्या अंतरात तीन वेळा ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा आयोजित झाल्या.

ऑनलाइन ही फक्त करोना काळापुरतीच गरज आहे, असे म्हणता येणार नाही. त्यातच कुस्ती, कराटे, बॉक्सिंग, टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो असे खेळ ऑनलाइन पद्धतीने खेळणे शक्य नाहीत.  करोनामुळे जगावर आर्थिक मंदीचे सावट आहे, त्याचा फटका क्रीडा क्षेत्रालाही तीव्रतेने बसला आहे. क्रीडा ही निश्चितच पुढील काही काळासाठी पहिली पसंती राहणार नाही. मूलभूत गरजा भागवण्यावर आता अनेकांची पहिली पसंती असेल. क्रीडा स्पर्धा म्हटल्या की खेळाडूंचे दौरे आले, त्यांच्या निवासाचा खर्च आला. मात्र हे खर्च कमी करायचे असतील, तर ऑनलाइन स्पर्धा हा उत्तम पर्याय ठरेल.

ऑनलाइन क्रीडा स्पर्धाचे आव्हान पेलताना इंटरनेट सेवा अधूनमधून खंडित होणे, गैरप्रकार रोखणे या अडचणी महत्त्वाच्या असतील. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता ऑनलाइन स्पर्धाना पर्याय नाही हे निश्चित आहे.

supriya.dabke@expressindia.com