टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यासंदर्भात जवळपास साडेतीन लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचा समावेश असलेली ऑनलाइन याचिका टोक्यो सरकारकडे दाखल करण्यात आली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेतील नवे रूप घातक असून जपानमध्ये आणीबाणी लागू असलेल्या टोक्यो, ओसाका आणि अन्य शहरांमधून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख तसेच आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रय़ू पार्सन्स यांच्याकडेही ही याचिका सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा, टोक्यो संयोजन समितीच्या अध्यक्षा सेइको हशिमोटो आणि बाख हे पूर्वनियोजित वेळेनुसारच ऑलिम्पिक स्पर्धा होईल, असे वारंवार सांगत आहेत.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेला २३ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. परंतु जपानमधील ७० ते ८० टक्के नागरिकांनी ऑलिम्पिक रद्द करण्याला तसेच लांबणीवर टाकण्यास पसंती दर्शवली आहे. केंजी उसूनोमिया या वकिलाने ही याचिका दाखल केली आहे. अनेक वेळा टोक्योचे गव्हर्नर म्हणून काम पाहणाऱ्या उसूनोमिया यांनी ५ मे रोजी याविषयीची घोषणा केल्यानंतर २४ तासांत ५० हजार लोकांनी ऑलिम्पिक रद्द करण्यास मतदान केले होते.

आणीबाणीत वाढ

ऑलिम्पिकला दोन महिन्यांचा कालावधी बाकी असताना जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी टोक्योसह काही शहरांमधील आणीबाणीमध्ये वाढ केली आहे. याआधी सहा शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यात ऑलिम्पिक मॅरेथॉन स्पर्धा होणाऱ्या होक्कायडो, हिरोशिमा आणि ओकायामा या तीन शहरांची भर पडली आहे.

इरफानसह पाच जणांचा अहवाल नकारात्मक

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चालण्याच्या शर्यतीसाठी पात्र ठरलेल्या के. टी. इरफानसह पाच जणांच्या दुसऱ्या करोना चाचणीचे अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती बेंगळूरुमधील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) केंद्राने दिली आहे. ‘साइ’ने ७ मे रोजी घेतलेल्या करोना चाचणीत पाच अ‍ॅथलेटिक्सपटूंचा अहवाल सकारात्मक आला होता. या सर्व खेळाडूंना २९ एप्रिलला लशीची पहिली मात्रा देण्यात आली होती.