भारतीय खेळाडूंवरील एकूण खर्चापैकी केवळ १.६६ टक्के खर्चाचे फलित!

रिओ ऑलिम्पिकसाठी भारताच्या एकूण ११७ खेळाडूंच्या तयारीसाठी सरकारने मागील वर्षी सुरू केलेल्या ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम’ (टॉप्स) अंतर्गत एकूण ३६.८५ कोटी रुपये खर्च केले. मात्र, या एकूण खर्चामधील केवळ १.६६ टक्के इतकाच पैसा रिओमध्ये पदकाची कमाई केलेल्या भारताच्या दोन खेळाडूंवर खर्च करण्यात आल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालातून उघड झाली आहे.

भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली. ‘टॉप्स’ अंतर्गत या दोघींवर एकूण खर्चापैकी केवळ ६१.१३ लाख रुपये खर्च करण्यात आले. तर विकास गौडा, सायना नेहवाल आणि योगेश्वर दत्त या दुखापतग्रस्त खेळाडूंवर तब्बल २.५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय, उत्तेजक प्रकरणात अडकलेल्या नरसिंग यादव, इंद्रजित सिंग आणि धर्मवीर सिंग यांच्यावर एकूण ९०.४९ लाख रुपये खर्च करण्यात आले. एकूण खर्च झालेल्या ३६.८५ कोटींपैकी जवळपास निम्मा खर्च हा भारताच्या नेमबाजी गटावर करण्यात आला आहे. गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र, यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांनी पुरती निराशा केली. भारताच्या नेमबाजांच्या तयारीवर १५.३९ कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती अहवालातून नमूद करण्यात आली आहे.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया भारतीय खेळाडूंच्या गरजा भागविण्यासाठी मार्च २०१५ साली ‘टॉप्स’ ही योजना सुरू करण्यात आली होती. खेळाडूंच्या प्रशिक्षकांची आणि इतर सहकाऱयांची फी, स्पर्धेदरम्यानच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च, सराव शिबीराचा खर्च आणि खेळ साहित्यांची खरेदी, असा सर्व खर्च ‘टॉप्स’ अंतर्गत सरकारने देऊ केला होता.

money-759

मार्च २०१५ मध्ये माजी क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी खेळाडूंना अद्ययावत सेवा-सुविधा आणि त्यांच्या प्रगतीसाठी २०१२ ते डिसेंबर २०१५ या काळात एकूण ७५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा लोकसभेत केली होती. केंद्रीय अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आली होती. यामध्ये ६७ क्रीडा संघटनांना मिळणाऱया शासकीय अनुदानाचाही समावेश होता. अर्थात भारत सरकारने आपल्या खेळाडूंवर केलेला खर्च इतर देशांच्या तुलनेत कमी असला तरी करण्यात आलेल्या खर्चातून काहीच साध्य झाले नसल्याचे चित्र आहे.

भारतीय खेळाडूंवर होणारा खर्च इतर देशांपेक्षा कमी असल्याची दखल क्रीडामंत्री विजय गोयल यांनी घेतली आहे. खेळाडूंसाठीच्या नव्या योजनांवर आम्ही विचार करत असून, खेळाडूंना अद्ययावत सुविधा देण्याचे लक्ष्य असणार असल्याचे विजय गोयल ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाले. देशातील खेळाडूंनी जागतिक व्यासपीठावर चांगली कामगिरी करावी अशी आपली आशा असले, तर त्यांच्या सरावासाठी आणि प्रशिक्षकांसाठीच्या बजेटमध्ये नक्कीच वाढ करण्याची गरज असल्याचेही गोयल यांनी मान्य केले.