टोक्यो : करोनाची भीती आणि पुढील दिवशी सामने असल्यामुळे नेमबाजी, बॅडमिंटन, तिरंदाजी, हॉकी यांच्यासह एकूण सात क्रीडा प्रकारांमधील भारतीय क्रीडापटूंनी शुक्रवारी होणाऱ्या ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे भारताचे फक्त २८ क्रीडापटूंचे पथक संचलनात सहभागी होईल.

पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम यांना भारताने ध्वजवाहक म्हणून उद्घाटन सोहळ्यात मान दिला आहे. संचलनातील भारताच्या ऑलिम्पिक पथकात हॉकी (१), बॉक्सिंग (८), टेबल टेनिस (४), नौकानयन (२), जिम्नॅस्टिक्स (१), जलतरण (१), नौकानयन (४), तलवारबाजी (१) अशा संख्येने एकूण २२ क्रीडापटू आणि सहा अधिकाऱ्यांचा समावेश असेल. संचलनात जपानी वर्णमालेनुसार संघांना क्रम देण्यात आले असून, भारताचा क्रमांक २१वा असेल.

दरम्यान, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर उद्घाटन सोहळ्याचा आनंद लुटणार आहेत. याशिवाय हरयाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग, बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

संचालकाची उचलबांगडी

टोक्यो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याचे संचालक केंटारो कोबायाशी यांची १९९८मध्ये केलेल्या एका विनोदाप्रकरणी उचलबांगडी करण्यात आली आहे. मानव जातीच्या विनाशासंदर्भात त्यांनी केलेला विनोद महागात पडला आहे. विशेष म्हणजे उद्घाटन सोहळ्याला दोन दिवस शिल्लक असतानाच त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ‘‘उद्घाटन सोहळा अवघ्या काही तासांवर आला असताना कोबायाशी यांच्या कृत्याने नागरिकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी मी मनापासून माफी मागते,’’ असे संयोजन समितीच्या अध्यक्षा सेईको हशिमोटो यांनी सांगितले. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा म्हणाले की, ‘‘कोबायाशी यांचे वक्तव्य अपमानकारक आणि अस्वीकारार्ह आहे. पण पूर्वनियोजित वेळेनुसारच उद्घाटनाचा सोहळा पार पडेल.’’

तिरंदाजी, ज्युदो, बॅडमिंटन, वेटलिफ्टिग, टेनिस, हॉकी (पुरुष आणि महिला) आणि नेमबाजी या क्रीडा प्रकारांमधील क्रीडापटूंचे शुक्रवारी आणि शनिवारी सामने होणार आहेत. त्यामुळे ते उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.

-नरिंदर बत्रा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष