भारत-इंग्लंड कसोटी मालिका

प्रतिभावान अष्टपैलू अक्षर पटेल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी डावखुरा फिरकीपटू शाहबाझ नदीमऐवजी अक्षरचे भारतीय संघातील स्थान पक्के मानले जात आहे.

चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला २२७ धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर असणाऱ्या भारतीय संघात अक्षरच्या रूपात किमान एकमेव बदल अपेक्षित आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीला शनिवार, १३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे.

डाव्या हाताने गोलंदाजी आणि फलंदाजी करणाऱ्या अक्षरला मालिकेतील पहिल्या कसोटीसाठीच संघात स्थान देण्यात येणार होते. परंतु नाणेफेकीपूर्वी सरावादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने नदीमचा अंतिम ११ खेळाडूंत समावेश करण्यात आला. परंतु नदीम छाप पाडण्यात अपयशी ठरला.

‘‘अक्षर दुखापतीतून सावरल्यामुळे संघ व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे. फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीवर दीर्घकाळ एकाच टप्प्यावर गोलंदाजी करून धावा रोखण्यासाठी अक्षर उपयुक्त ठरू शकतो. त्याशिवाय तो फलंदाजीतही उत्तम योगदान देऊ शकतो. मात्र कर्णधार विराट कोहली याविषयी लवकरच अंतिम निर्णय घेईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

मांजरेकर यांच्याकडून रहाणेवर टीका

माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतरही रहाणे फलंदाजीत छाप पाडण्यात अपयशी ठरत असल्याने मांजरेकर यांनी निराशा व्यक्त केली आहे. ‘‘कर्णधार म्हणून चमक दाखवणाऱ्या रहाणेविषयी मला एकच तक्रार आहे ती म्हणजे त्याची फलंदाजी. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये दुसऱ्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर रहाणेने अनुक्रमे २७*, २२, ४, ३७, २४, १ आणि ० अशा धावा केल्या आहेत. महान खेळाडू शतकानंतर त्यांची कामगिरी अधिक उंचावतात. परंतु रहाणे मात्र दडपणाखाली ढेपाळत चालला आहे,’’ असे ट्वीट मांजरेकर यांनी केले आहे.

कोहलीची पाचव्या स्थानी घसरण

दुबई : तीन वर्षांनंतर प्रथमच विराट कोहलीची ‘आयसीसी’च्या जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने दोन स्थानांनी आगेकूच करत तिसरा क्रमांक मिळवला आहे. कोहली ८५२ गुणांसह पाचव्या स्थानी असून न्यूझीलंडचा केन विल्यम्सन सर्वाधिक ९१९ गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे. त्यानंतर अनुक्रमे स्टीव्ह स्मिथ (८९१), रूट (८८३) आणि मार्नस लबूशेन (८७८) यांचा क्रमांक आहे. गोलंदाजीत भारताचा फिरकीपटू अश्विनने ७७१ गुणांसह सातवे, तर जसप्रीत बुमराने ७६९ गुणांसह आठवे स्थान मिळवले आहे.