२०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलंकेने भारताला विकला असल्याचे काही दिवसांपूर्वी ठामपणे म्हणणारे श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगमगे यांनी आता फिरकी घेतली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याविषयी आपल्याला फक्त संशय असून यासंबंधी चौकशी व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अलुथगमगे यांच्या आरोपानंतर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यालयाने क्रीडा सचिव केड्स रुवाचंद्र यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली होती. ‘‘विश्वचषकाच्या अंतिम फेरीविषयी मला संशय आहे. त्यामुळे याबाबत चौकशी व्हावी, इतकीच माझी इच्छा होती. माझ्याकडे असणारे काही पुरावे मी श्रीलंकेचे सध्याचे क्रीडामंत्री दुल्लास अल्हापेरुमा यांच्याकडे सुपूर्द केले असून ते लवकरच यामागील शोध घेतील, अशी आशा आहे,’’ असे अलुथगमगे म्हणाले. श्रीलंकेचा त्या वेळचा कर्णधार कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी अलुथगमगे यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंबंधी पुरावे सादर करण्याची मागणी केली होती.