भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आगामी वर्षात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी, टीम इंडियात जलदगती गोलंदाजांसाठी एक जागा शिल्लक असल्याचं स्पष्ट केलंय. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकसाठी भारतीय संघाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जलदगती गोलंदाजांसाठी संघात एकच जागा शिल्लक आहे, बाकीच्या सर्व गोष्टी निश्चीत झाल्याचंही विराटने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

“माझ्या मते एका जागेसाठी ही शर्यत असेल. ३ गोलंदाजांनी संघात आपलं स्थान कमी-अधिक प्रमाणात पक्क केलं आहे. त्यामुळे उरलेल्या एका जागेसाठी कोणता खेळाडू बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.” विराट भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याआधी हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलत होता.

जलदगती गोलंदाजांसाठी भारतीय संघात असलेल्या शर्यतीवर विराटने समाधान व्यक्त केलं. “मी याला कोणत्याही दृष्टीकोनातून समस्या मानत नाही. माझ्या मते भुवनेश्वर आणि बुमराह चांगले गोलंदाज आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी ही सातत्यपूर्ण आहे. दीपक चहरनेही गेल्या काही दिवसांत चांगली कामगिरी केली आहे. पुनरागमनानंतर शमीनेही चांगली कामगिरी केली आहे. जर तो चांगल्या फॉर्मात आला आणि टी-२० क्रिकेटच्या गरजेनुसार त्याने गोलंदाजी केली, तर ऑस्ट्रेलियात तो संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकतो. नव्या चेंडूवर शमी चांगल्या पद्धतीने विकेट घेतो, याचसोबत तो यॉर्कर चेंडूही टाकतो.” विराटच्या या वक्तव्यानंतर भारतीय संघात कोणता गोलंदाज टी-२० विश्वचषकासाठी आपली जागा नक्की करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.