महिलांमध्ये पुण्याचा गतविजेत्या ठाण्याला धक्का; ऋषिकेश मुर्चावडे, काजल भोर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर झालेल्या ५६व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुण्याने महिलांच्या गटातील अंतिम सामन्यात गतविजेत्या ठाण्याला नमवून विजेतेपदावर नाव कोरले. पुरुषांमध्ये मुंबई उपनगरने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधताना पुण्यावर सरशी साधली.

रविवारी सायंकाळी झालेल्या पुरुष गटातील उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांमध्ये १७-१७ अशी बरोबरी होती. त्यानंतर झालेल्या अलाहिदा डावातही दोन्ही संघांनी प्रत्येकी सात गुण मिळवले. परंतु उपनगरने पुण्याला लघुत्तम आक्रमणाद्वारे अवघ्या ५९ सेकंदांनी पराभूत केले. उपनगरसाठी ऋषिकेश (१.२० मिनिट, १.२० मि. आणि २ गडी), अक्षय भांगरे (१.२० मि., १.४० मि. आणि ३ गडी) आणि अनिकेत पोटे (१.१० मि., १.३० मि. आणि ५ गडी) यांनी अष्टपैलू कामगिरी करून पुण्याला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. पुण्याकडून सागर लेंगरे (१.२० मि., १ मि. आणि ५ गडी), सुयश (१.२० मि., १.४० मि. आणि २ गडी) आणि प्रतीक वाईकर (१.४० मि., २ मि. आणि ३ गडी) यांनी झुंजार खेळ केला.

महिलांच्या गटातील अंतिम लढतीत पुण्याने गतविजेत्या बलाढय़ ठाणे संघावर ११-९ अशी दोन गुणांनी मात केली. सलग पाच वर्षे विजेतेपद मिळवल्यानंतर प्रथमच ठाण्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुण्यातर्फे कोमल दारवटकर (२.३० मि. १.४० मि.), स्नेहल जाधव (२ मि., १.३० मि.) यांनी संरक्षणात कमाल केली, तर काजल (१.२० मि. आणि पाच गडी) आणि भाग्यश्री जाधव (१.५० मि. आणि २ गडी) यांनी अष्टपैलू कामगिरी केली. ठाण्यातर्फे रेश्मा (२.२० मि., १.३० मि. आणि २ गडी), मीनल भोईर (२.१० मि. आणि १ गडी) आणि रुपाली बडे (२.३० मि. आणि १ गडी) यांनी संघाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु त्यांना विजेतेपदाचा षटकार लगावण्यात अपयश आले.

लघुतम आक्रमण म्हणजे काय?

खो-खोमध्ये प्रत्येकी ९ मिनिटांचे चारही डाव बरोबरीत सुटले, तसेच त्यानंतरचा अलाहिदा डावही बरोबरीत सुटला तर लघुतम आक्रमणाद्वारे सामन्याचा निकाल लागतो. यामध्ये संरक्षण करणाऱ्या संघाचा कोणताही एक खेळाडू बाद होईपर्यंत वेळ मोजण्यात येते. त्यानुसार पुरुषांच्या अंतिम सामन्यात लघुतम आक्रमणात उपनगरच्या अक्षय भांगरेने बाद होण्यापूर्वी १.६ मिनिटे संरक्षण केले. मात्र पुण्याचा सुयश गरगटे या डावात अवघ्या ७ सेकंदांतच बाद झाला. त्यामुळे उपनगरने ५९ सेकंदांनी सामन्यासह जेतेपदसुद्धा जिंकले.

ऋषिकेश, काजल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

उपनगरच्या ऋषिकेश मुर्चावडेने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या राजे संभाजी पुरस्कारावर मोहोर उमटवली, तर महिलांमध्ये पुण्याची काजल भोर राणी अहिल्या पुरस्काराची मानकरी ठरली. पुण्याचा अक्षय गणपुले आणि ठाण्याची रेश्मा राठोड यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या गटात सर्वोत्तम संरक्षकाचा पुरस्कार मिळवला. पुण्याचेच सुयश गरगटे आणि प्रियंका इंगळे सर्वोत्तम आक्रमक खेळाडू ठरले.