देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका क्रीडा संघटनांनाही बसला आहे. बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. सध्याच्या घडीला देशातील परिस्थिती पाहता, आयपीएल खेळवली जाईल की नाही याबद्दल शंका आहे. प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. एकीकडे बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवता येईल का याबद्दल विचार करत असताना राजस्थान रॉयल्स संघाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष रणजित बारठाकूर यांनी, सध्याच्या घडीला IPL छोट्या स्वरुपात खेळवलं तरीही चालणार असल्याचं म्हटलं आहे.

“केवळ भारतीय खेळाडूंना सोबत घेऊन छोट्या स्वरुपात स्पर्धा खेळवण्यासाठी आम्ही तयार आहोत. कितीही झालं तरीही ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठीची आहे. बीसीसीआय सर्व संघमालकांचा विचार करुन योग्य निर्णय घेईल अशी आम्हाला आशा आहे. सध्याच्या परिस्थिती ही खडतर आहे, पण बीसीसीआय यातून योग्य मार्ग काढेल. काही दिवसांपूर्वी परदेशी खेळाडूंशिवाय आयपीएल खेळवण्याचा कोणीही विचार केला नव्हता…मात्र आता संपूर्ण स्पर्धा रद्द करण्याऐवजी भारतीय खेळाडूंसोबत छोट्या प्रमाणात स्पर्धा खेळवायला हरकत नाही.” बारठाकूर पीटीआयशी बोलत होते.

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत परदेशातील नागरिकांना भारतात येण्यासाठी बंदी केली होती. आयपीएलचा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ३ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान होण्याचा अंदाज आहे. याचसोबत सर्व संघमालकांनाही १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागू शकतं. याचसोबत स्पर्धा रद्द झाल्यास खेळाडूंनाही फटका बसणार आहे. त्यामुळे आगामी काळात बीसीसीआय आयपीएलबद्दल काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.