भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर लोकेश राहुल याचं संघातलं स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत लोकेश राहुलला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अनेक माजी खेळाडूंनी लोकेश राहुलच्या शैलीबद्दल चिंताजनक मत व्यक्त केलं आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीने तर लोकेश राहुलच्या जागी रोहित शर्माला कसोटीमध्ये संधी द्या अशी मागणी केली आहे. त्यातचं भारतीय संघाचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही कसोटी संघात सलामीची जागा भारतासाठी डोकेदुखी ठरत असल्याचं मान्य केलंय. त्यामुळे लोकेश राहुलचं कसोटी संघातलं स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.

संजय बांगर यांच्या जागेवर निवड समितीने विक्रम राठोड यांना संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यापासून राठोड आपली फलंदाजी प्रशिक्षकपदाची सुत्र सांभाळतील. यावेळी BCCI च्या अधिकृत संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत राठोड यांनी भारतीय फलंदाजीवर भाष्य केलं. “वन-डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीत योग्य फलंदाजी होत नाहीये, यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचच आहे आणि तो आम्ही काढूच. याचसोबत कसोटी संघात सलामीची जोडी हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. सलामीच्या जागेसाठी सध्या अनेक खेळाडू स्पर्धेत आहेत. त्यामुळे कोणत्यातरी एका खेळाडूला योग्य संधी देण्यासाठी एक मार्ग शोधावा लागणार आहे.”

यावेळी विक्रम राठोड यांनी श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांचंही कौतुक केलं. वन-डे संघात हे दोन्ही खेळाडू चांगला पर्याय ठरु शकतात. दोन्ही खेळाडूंनी स्थानिक क्रिकेट आणि भारत अ संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या खेळाडूंवर जबाबदारी टाकल्यास ते चांगली कामगिरी करतील असा मला आत्मविश्वास आहे, राठोड मनिष पांडे आणि श्रेयस अय्यरच्या फलंदाजीबद्दल बोलत होते. विश्वचषक स्पर्धेतही भारताला फलंदाजीमध्ये फटका बसला होता. त्यातच कसोटी मालिकेत लोकेश राहुलचं अपयश यामुळे फलंदाजीतल्या समस्या कमी होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत विक्रम राठोड भारताची फलंदाजीची समस्या कधी सोडवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.