आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे क्रिकेटची काळवंडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी कठोर पावले उचलली आहेत. सट्टेबाजी केल्याचे आरोप असलेला राजस्थान रॉयल्सचा सहमालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला बीसीसीआयने निलंबित केले आहे, तर आयपीएलला पुन्हा प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्यासाठी १२ उपाययोजनांचे ‘स्वच्छता अभियान’ (ऑपरेशन क्लीन-अप) राबवले आहे.
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणानंतर हादरलेल्या बीसीसीआयने आयपीएलची प्रतिमा सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत आयपीएलची विश्वासार्हता टिकवण्यासाठी ‘ऑपरेशन क्लीन-अप’ (स्वच्छता अभियान) या नावाने एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी या अभियानाअंतर्गत १२ उपाययोजना सुचविल्या आहेत. चीअरलीडर्स आणि रात्रीच्या पाटर्य़ावर बंदी याचप्रमाणे ड्रेसिंगरूम व डग-आऊटमधील खेळाडूंच्या वावरण्यावर र्निबध घालण्याचा यात समावेश आहे. सर्वानीच बीसीसीआयच्या आचारसंहितेचे कठोर पालन करणे आवश्यक असून संघमालकांना ड्रेसिंगरूम व डग-आऊटमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव या शिफारसींचाही समावेश आहे.
बीसीसीआयच्या १२ शिफारशी-
१) आयपीएलमधून चीअरलीडर्सवर बंदी. तसेच खेळाडू- पदाधिकाऱ्यांसाठी रात्री रंगणाऱ्या पाटर्य़ा हद्दपार .
२) खेळाडू, पदाधिकारी आणि फ्रँचायझी मालकांनी आचारसंहितेचे कठोर पालन करणे आवश्यक.
३) ड्रेसिंगरूम आणि डग-आऊटमधील खेळाडूंच्या वावरण्यावर बंदी. सामन्यादरम्यान खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये किंवा डग-आऊटमध्ये फ्रँचायझी मालकांना प्रवेशबंदी.
४) स्पर्धेला सुरुवात होण्याआधी सर्व संघांतील खेळाडूंनी आणि पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे टेलिफोन क्रमांक बीसीसीआयकडे सादर करणे सक्तीचे.
५) संघ वास्तव्याला असलेल्या हॉटेलमधील लाचलुचपतविरोधी व सुरक्षा पथकाच्या पदाधिकाऱ्यांचे अचूक मोबाइल क्रमांक मिळणार तसेच मैदानाचीही पाहणी होणार.
६) सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये मोबाइल जॅम करण्यासाठी टॉवर उभारणार.
७) स्पर्धेबाबत सल्ला घेण्यासाठी तसेच आराखडा तयार करण्यासाठी कर्णधारांच्या बैठका नियमितपणे होणार.
८) निवड समितीतील कोणत्याही सदस्याला एकाही फ्रँचायझीशी करारबद्ध होण्याची परवानगी मिळणार नाही.
९) खेळाडूंनी एखाद्या संस्थेशी किंवा व्यक्तीशी केलेल्या सर्व व्यवहारांची माहिती बीसीसीआयला देणे बंधनकारक.
१०) खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांच्या कराराविषयीची आणि मानधनाबाबतची सर्व माहिती फ्रँचायझींनी बीसीसीआयला सादर करणे गरजेचे.
११) खेळाडूंच्या ईअर-प्लग किंवा मायक्रोफोन वापरण्यावर बंदी आणणार.
१२) लवकरच सुरक्षा नियंत्रण धोरण अमलात आणणार.
सट्टेबाज अश्विन अगरवालला न्यायालयीन कोठडी
मुंबई : मुंबईतील स्थानिक न्यायालयाने सट्टेबाज अश्विन अगरवाल ऊर्फ टिंकू दिल्लीची २४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच अन्य आरोपी किशोर बदलानी व परेश बाटिया या दोघांना मात्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. किशोर व परेश यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर सुटका केल्याचे सरकारी वकील किरन बेंडबार यांनी सांगितले. अश्विन अगरवालचा वकील तरुण शर्माने जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे स्पष्ट केले. टिंकू व्यतिरिक्त न्यायालयाने जामिनावर मुक्तता केलेल्या आरोपींची संख्या १४ झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेने याप्रकरणी १५ जणांना अटक केली होती.

कुंद्रा निलंबित
बीसीसीआयच्या शक्तिशाली कार्यकारिणी समितीने सोमवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणावर गांभीर्याने चर्चा केली. याचप्रमाणे चौकशी चालू असेपर्यंत राज कुंद्राला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एन. श्रीनिवासन यांचा जावई आणि चेन्नई सुपर किंग्जचा व्यवस्थापन सदस्य (टीम प्रिन्सिपल) गुरुनाथ मयप्पन याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेला कुंद्रा हा दुसरा संघमालक आहे. राजस्थान रॉयल्समध्ये ११.७ टक्के हिस्सेदारी असलेल्या कुंद्रा याने दिल्ली पोलिसांकडे आपल्या सट्टेबाजीचा कबुलीजबाब दिल्यानंतर दालमिया यांनी कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक बोलावली होती. हे आरोप सिद्ध झाल्यास राजस्थान रॉयल्सवर हकालपट्टीची कारवाई होऊ शकेल. त्यामुळे सावधगिरीची उपाययोजना म्हणून फ्रेंचायझीने कुंद्रापासून दूर राहणेच पसंत केले आहे.

श्रीशांत, अंकितसह १९ जणांना जामीन
नवी दिल्ली : स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी अटक करण्यात आलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, अंकित चव्हाण यांच्यासह १९ जणांना दिल्ली न्यायालयाने जामीन दिला आहे. या सर्वाना आता आपले पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावे लागणार असून, ते देश सोडून जाऊ शकत नाहीत. परंतु देशात कुठेही जाण्यास त्यांना परवानगी असेल. एस. श्रीशांतचा मित्र आणि सट्टेबाज जिजू जनार्दनचाही यात समावेश आहे. राजस्थान रॉयल्सचा अटक झालेला तिसरा क्रिकेटपटू अजित चंडिलाने जामिनासाठी अर्ज केला नव्हता. मंगळवारी या १९ जणांची दिल्लीच्या तिहार न्यायालयातून सुटका होणार आहे. या क्रिकेटपटू आणि सट्टेबाजांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्याबाबत पुरेसे पुरावे पोलिसांनी सादर केले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. संघटित गुन्हेगारीच्या संदर्भात ‘मोक्का’ लागू होतो. परंतु पोलीस या आरोपींचे संघटित संबंध जोडण्यात अपयशी ठरले.

विक्रम अगरवालला अटक
चेन्नई : सट्टेबाजांशी संपर्कात असल्याच्या आरोपावरून चेन्नईतील हॉटेल व्यावसायिक विक्रम अगरवालला सोमवारी तामिळनाडू पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली.  गुन्हे अन्वेषण विभागाने अगरवालची सात तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. अगरवाल हा सट्टेबाज उत्तम जैन ऊर्फ किट्टी याच्याशी संपर्कात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

रामन यांच्याकडेही कुंद्रासंदर्भात तक्रार -दालमिया
‘‘बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीने राज कुंद्रा याच्यावर चौकशी चालू असल्यामुळे निलंबनाची कारवाई केली आहे. आयपीएलच्या सहाव्या हंगामात सट्टेबाजी केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत,’’ असे बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सांगितले. ‘‘दिल्ली पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी कुंद्राची ११ तास चौकशी केली. या चौकशीत कुंद्राने आपण सट्टेबाजीत पैसा लावल्याची कबुली दिली. आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रामन यांच्याकडेसुद्धा यासंदर्भात तक्रार आली होती. मी त्या तक्रारदाराचे नाव सांगू शकणार नाही,’’ असे दालमिया यांनी पुढे सांगितले. ‘‘स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे नाव केंद्रस्थानी आहे, परंतु वस्तुस्थिती पूर्णपणे समोर आल्याशिवाय कुणावरही कठोर कारवाई करणे चुकीचे ठरेल,’’ असे ते म्हणाले.

रवी सावंत यांची बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती
बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीने सोमवारी महत्त्वाचे निर्णय घेताना सचिवपदावर संजय पटेल यांची, तर कोषाध्यक्षपदावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत यांची नियुक्ती केली आहे. स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे व्यथित झालेल्या संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांनी राजीनामे दिल्यामुळे ही पदे रिक्त झाली होती.

दोन निवृत्त न्यायमूर्तीची चौकशी समिती
गुरुनाथ मयप्पन, राज कुंद्रा, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांची चौकशी निवृत्त न्यायमूर्ती टी. जयराम चौटा आणि आर. बालसुब्रमण्यम यांची द्विसदस्यीय समितीच करणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.

सवानी यांचा अहवाल शिस्तपालन समितीकडे
भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, अशोक चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्या स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयने लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख रवी सवानी यांनी तयार केलेला अहवाल सोमवारी कार्यकारिणी समितीपुढे ठेवला. कार्यकारिणी समितीने हा अहवाल बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीकडे पाठवला आहे. कार्यकारिणी समितीने या खेळाडूंना आरोपपत्र पाठविण्याचे निश्चित केले आहे. याचप्रमाणे शिस्तपालन समितीमध्ये एन. श्रीनिवासन यांचा समावेश नसेल. त्यामुळे अरुण जेटली व निरंजन शाह हे दोन सदस्य याबाबतची कार्यवाही करतील. सवानी यांचा लिफाफेबंद अहवाल कार्यकारिणी समितीने उघडला नाही, तर तो थेट शिस्तपालन समितीकडे सुपूर्द करण्यात आला. सध्या हे खेळाडू न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल.

तिरंगी स्पध्रेसाठी भारताच्या विंडीज दौऱ्याला मंजुरी
वेस्ट इंडिजमध्ये २८ जून ते ११ जुलै या कालावधीत होणाऱ्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेत भारतीय क्रिकेट संघ सहभागी होणार आहे. श्रीलंका या स्पर्धेतला तिसरा संघ असणार आहे. बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या तातडीच्या बैठकीत या दौऱ्याला मंजुरी देण्यात आली.  यानंतर भारतीय संघ कसोटी व एकदिवसीय सामन्यांसाठी झिम्बाब्वेला रवाना होणार आहे. ऑगस्ट महिन्यात होणारा भारतीय ‘अ’ संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर, तर जून-जुलैमध्ये भारताचा १९-वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

बीसीसीआय न्यायालयाकडून मुदतवाढ मागणार?
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी चौकशी अहवाल पाठविण्यासाठी बीसीसीआय सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे. मंडळाच्या कार्यकारिणीने हा अहवाल अतिशय परिपूर्ण असावा व त्यासाठी न्यायालयाकडून मुदतवाढ घ्यावी, असे मत व्यक्त केले आहे. मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अहवाल अंतिम टप्प्यात असला तरी अनुमान काढण्यापूर्वी तो सादर करणे अयोग्य होईल. बी. एस. चौहान व दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने मंडळाला स्पॉट-फिक्सिंगबाबत १५ दिवसांमध्ये अहवाल पाठविण्यास सांगितले होते.

‘‘मला ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आले आहे. महत्त्वपूर्ण पदांवर असलेल्या व्यक्तींनी सत्तेचा वापर करत मला तोफेच्या तोंडी दिले आहे. या निर्णयाने मला धक्का बसला आहे. बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या आपत्कालीन बैठकीत माझ्याविरुद्ध एकतर्फी निर्णय घेण्यात आला. निलंबनाच्या निर्णयाविरोधात मी दाद मागणार आहे.’’
-राज कुंद्रा