इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी संघात तीन वेगवान गोलंदाजांना संधी

मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवण्यात येणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराचे पुनरागमन निश्चित असून फिरकीपटू कुलदीप यादवला बुमरासाठी संघातील स्थान गमवावे लागू शकते.

चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला २२७ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. परंतु दुसऱ्या कसोटीत भारताने पाहुण्यांना जशास तसे उत्तर देत ३१७ धावांनी विजय मिळवला. मालिकेतील तिसऱ्या कसोटीला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे.

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज बुमराला दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळली. परंतु तिसरी कसोटी गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार असून अहमदाबादची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक ठरण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गुलाबी चेंडू सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर स्विंग होतो, म्हणूनच बुमरा, इशांत आणि सिराज या वेगवान त्रिकुटाला भारतीय संघ व्यवस्थापन पसंती देण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

‘‘अहमदाबादच्या पुनर्बांधणी करण्यात आलेल्या स्टेडियमवर भारत प्रथमच खेळत असल्याने येथील खेळपट्टीविषयी खात्रीशीरपणे सांगणे कठीण आहे. परंतु प्रकाशझोतातील कसोटी गुलाबी चेंडूने खेळवण्यात येत असल्याने यामध्ये नेहमीच वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. अशा परिस्थितीत भारत तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीटू या रणनीतीनुसार मैदानात उतरू शकतो,’’ असे संघ व्यवस्थापनातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

खेळाडूंना अहमदाबादला हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली : मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रिकेटपटूंना १ मार्चआधी अहमदाबादमध्ये दाखल होण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत. शिखर धवन, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि राहुल तेवतिया हे सध्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होत असून त्याआधी खेळाडूंना विलगीकरणात राहावे लागणार आहे.

सायंकाळच्या सत्रात सावधगिरी आवश्यक -रोहित

प्रकाशझोतातील तिसऱ्या कसोटीत सायंकाळच्या सत्रात संयमाने फलंदाजी केली, तर नक्कीच सामन्यावर आमचेच वर्चस्व दिसून येईल, असे मत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केले. ‘‘आतापर्यंत मी स्वत: कधीही एखाद्या कसोटीत सायंकाळच्या वेळेस फलंदाजी केलेली नाही. संघातील अन्य फलंदाज नेहमीच सायकांळच्या सत्राविषयी चर्चा करतात. त्यामुळे त्यादरम्यानचा काळ सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. कारण सूर्य मावळताना चेंडू हवेत स्विंग होऊन खेळपट्टीकडूनही गोलंदाजांना मदत मिळते,’’ असे रोहित म्हणाला.