मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीला महिन्याभराचा अवधी उरला असतानाच रणांगण आता चांगले तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खेळ विकास महाव्यवस्थापक प्रा. रत्नाकर शेट्टी यांना या प्रतिष्ठेच्या निवडणुकीपासून रोखण्यासाठी एमसीएच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये आराखडा तयार करण्यात आला. यानुसार त्यांना माफीनाम्याची संधी देण्यात आली आहे. परंतु ती झिडकारल्यास आठवडय़ाभरात त्यांच्यावर कारवाई होण्याची चिन्हे असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
डिसेंबर २०१२मध्ये अहमदाबादला झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात तिकिटांचा काळा बाजार केल्याचा आरोप रत्नाकर शेट्टी यांनी एमसीएच्या मार्चमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांवर केला होता. यासंदर्भात एमसीएने शेट्टी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. त्याविषयी शेट्टी यांनी आपले उत्तरही पाठवले होते. परंतु एमसीएच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, शेट्टी यांना पुढील सात दिवसांत त्यांच्या वक्तव्याची ध्वनीचित्रफीत दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना माफी मागण्याची संधी देण्यात येईल. मगच त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांकडून समजते. दरम्यान, एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत, उपाध्यक्ष विजय पाटील आणि संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.