अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय बॉक्सिंगपटू ठरण्याची संधी

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये यापूर्वीच पदकनिश्चिती केलेली भारताची बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहाइन बुधवारी इतिहास रचण्याच्या निर्धाराने रिंगणात उतरेल. महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लवलिनासमोर जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीचे कडवे आव्हान असून ही लढत जिंकल्यास ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कोणत्याही वजनी गटाची अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली बॉक्सिंगपटू ठरण्याची तिला संधी आहे.

आसामच्या २३ वर्षीय लवलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले. विजेंदर सिंग आणि एम. सी. मेरी कोम यांच्यानंतर पदक जिंकणारी ती भारताची तिसरी बॉक्सिंगपटू ठरली आहे. मात्र लवलिनाने सुवर्णपदकासहच माघारी परतण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बुसेनाझने सुवर्ण मिळवले होते, तर लवलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

बुसेनाझविरुद्ध मी प्रथमच झुंज देणार असली तरी तिची बलस्थाने आणि कच्चे दुवे मला माहीत आहेत. माझे पदकनिश्चित झाले आहे. मात्र मला सुवर्णपदक जिंकूनच मायदेशी परतायचे आहे. त्यामुळे बुसेनाझला नमवून अंतिम फेरी गाठण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन. – लवलिना बोर्गोहाइन