अध्यक्षपदासाठी गांगुलीचा मार्ग सुकर

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) प्रतिमा डागाळलेली असतानाच, आता चांगले काम करण्याची संधी आहे. पुढील काही महिन्यांत भारतीय क्रिकेटचा कारभार सुरळीत होईल, असे आश्वासन भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिले. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सर्व प्रतिस्पध्र्यावर मात करणाऱ्या सौरव गांगुलीचा मार्ग सुकर झाला आहे.

बीसीसीआयच्या २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान निवडणुका होण्याची शक्यता असून अध्यक्षपदासाठी गांगुली हाच एकमेव उमेदवार असणार आहे. अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या गटांनी आपापला अध्यक्ष बनवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर गांगुलीने ब्रिजेश पटेल यांच्यावर मात करत अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला.

‘‘देशाचे प्रतिनिधित्व तसेच भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची भूमिका सांभाळणे, ही फार मोठी जबाबदारी आहे. गेल्या तीन वर्षांपासून बीसीसीआयची प्रतिमा काहीशी डागाळली आहे. त्यामुळे बीसीसीआयसाठी काही तरी चांगले आणि भरीव काम करण्याची हीच सुवर्णसंधी आहे. मी आणि माझे सहकारी एकत्र येऊन बीसीसीआयचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत,’’ असे गांगुलीने सांगितले.

अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे, असे ४७ वर्षीय गांगुलीने मान्य केले. ‘‘बीसीसीआय ही जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी संस्था आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळणे हीच मोठी जबाबदारी असते. नियमाप्रमाणे अध्यक्षपदाची जबाबदारी नऊ महिन्यांसाठी असली तरी ती स्वीकारून कार्य करावे लागेल,’’ असे गांगुली म्हणाला.

अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी श्रीनिवासन आणि ठाकूर या दोन्ही गटांमध्ये शह-काटशहाचे नाटय़ रंगले होते. याविषयी गांगुली म्हणाला की, ‘‘बैठक संपवून मी खाली उतरलो, तेव्हा मी अध्यक्षपदी विराजमान होईन याची कल्पनाही केली नव्हती. तोपर्यंत ब्रिजेश पटेल यांच्या नावाचीच चर्चा होती. पण मी पुन्हा जेव्हा वरती गेलो, तेव्हा संपूर्ण चित्र पालटले होते. बीसीसीआयच्या निवडणुकीत पारडे असे वर-खाली होते, याची मला कल्पनाही नव्हती.’’

शनिवारी गांगुली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक झाली होती, त्यावेळी बंगालमध्ये भाजपचा प्रचार करण्याचा प्रस्ताव गांगुलीसमोर ठेवण्यात आला होता. त्यावेळी गांगुलीने नकारात्मक उत्तर दिले होते, असेही समजते. ‘‘अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही. मला काहीही सांगण्यात आलेले नाही,’’ असे गांगुलीने स्पष्टीकरण दिले.

गांगुलीसमोर परस्पर हितसंबंधाचे आव्हान

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या सौरव गांगुलीसमोर आता परस्पर हितसंबंधाच्या मुद्दय़ाचे आव्हान समोर आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (सीएबी) अध्यक्ष आणि दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार अशा दुहेरी भूमिका सांभाळताना गांगुलीवर हितसंबंधाचे आरोप झाले होते. दिल्ली कॅपिटल्सच्या सल्लागारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गांगुलीला २३ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याआधी सीएबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. ‘‘हितसंबंध हा किचकट मुद्दा आहेच. त्यामुळे खेळाडूंना प्रशासकीय कामकाजात आणताना अनेक अडचणी येणार आहेत. कारण सध्या क्रिकेटपटूंसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत,’’ असे गांगुलीने सांगितले.

प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंवर लक्ष देणार : गेल्या तीन वर्षांपासून प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंची आर्थिक घडी व्यवस्थित करण्यासाठी मी बीसीसीआयचा कारभार पाहणाऱ्या प्रशासकीय समितीला विनंती करत होतो. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मी बीसीसीआयच्या प्रत्येक समभागधारकांशी बोलून प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंच्या आर्थिक नियोजनाविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे, असेही गांगुलीने सांगितले.