पाच दिवसांऐवजी चारदिवसीय कसोटी क्रिकेट खेळण्याला सचिन तेंडुलकरने स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवला आहे. ‘‘कसोटी क्रिकेटचा चाहता म्हणून माझा कसोटी क्रिकेटचे दिवस कमी करण्याला पूर्णपणे विरोध आहे. ज्याप्रमाणे गेली अनेक वर्षे कसोटी क्रिकेट खेळले जात आहे त्याप्रमाणेच आताही खेळले जावे,’’ असे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

‘‘जर चारदिवसीय कसोटी खेळली गेली तर फलंदाजांना एकदिवसीय क्रिकेटप्रमाणेच षटकांची मर्यादा असल्याचे जाणवत राहील. जास्तकरून दुसऱ्या दिवशीच्या खेळात उपहारापर्यंत फलंदाजांना अडीच दिवसच शिल्लक आहेत असे सतत जाणवेल. त्यातच पाचवा दिवस हा फिरकीपटू गाजवतात. जर पाचवा दिवसच राहिला नाही तर कसोटीतील रंगतच संपून जाईल. पहिला दिवस हा नेहमी वेगवान गोलंदाज गाजवतो ते पाहता फिरकी गोलंदाज हा नेहमीच पाचव्या दिवसाची वाट पाहतो. कारण पाचव्या दिवशी खेळपट्टीकडून चेंडू वळायला मदत मिळते,’’ याकडे सचिनने लक्ष वेधले.

‘‘मुळात चारदिवसीय कसोटी क्रिकेट का हवंय, तो निर्णय घेण्याची कारणे काय हे स्पष्ट झाले पाहिजे. प्रेक्षकांचा विचार करूनच जर चारदिवसीय कसोटी खेळवायच्या असतील तर मग एकदिवसीय, ट्वेन्टी-२० आणि काही वेळेस १० षटकांचे सामने का खेळवले जातात? फलंदाजांची सर्वात मोठी कसोटी ही कसोटी क्रिकेटमध्येच लागते. अर्थात त्यातच कसोटी क्रिकेटची खरी रंगत आहे,’’ असे २०० कसोटी खेळणाऱ्या सचिनने सांगितले.