ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि धोनीच्या वारसदाराचा शोध सुरू झाला. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये धोनीप्रमाणे अखेपर्यंत लढा देणारा ‘विजयवीर’ फलंदाज आणि चपळ यष्टीरक्षक भारताला कु ठून सापडणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये किमान फलंदाजीत तरी धोनीच्या स्थानासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

मुंबई इंडियन्सचा इशान किशन, किंग्ज इलेव्हन पंजाबचा के. एल. राहुल, राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन आणि दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत यांनी आतापर्यंतच्या ‘आयपीएल’मध्ये छाप पाडली असून राहुलने यष्टिरक्षकाची भूमिकाही समर्थपणे निभावत आपली दावेदारी भक्कम के ली आहे. मुंबईकरिता क्विंटन डीकॉक, तर राजस्थानसाठी जोस बटलर यष्टिरक्षकाची भूमिका बजावत असल्याने किशन आणि सॅमसनला अद्याप यष्टिरक्षणाची संधी मिळालेली नाही. अन्य तिघांच्या तुलनेत पंतला आतापर्यंतच्या चार सामन्यांत (३१, ३७*, २८, ३८) चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलता आला नसला तरी त्याने दिल्लीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

राहुलला वरच्या क्रमांकावर प्रमुख फलंदाज म्हणून पसंती मिळते. पंत आणि सॅमसन मात्र मधल्या फळीत खेळतात. सॅमसनने जवळपास दोन-तीन वर्षांपासून स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या असून राजस्थानच्या पहिल्या दोन विजयांचा तोच शिल्पकार ठरला. राहुलने बेंगळूरुविरुद्ध शतक झळकावले. किशननेसुद्धा बेंगळूरुविरुद्धच जवळपास अशक्यप्राय असा वाटणारा सामना तुफानी फलंदाजीच्या बळावर मुंबईच्या बाजूने फिरवला. मात्र त्या लढतीत त्याला शतकाने हुलकावणी दिली व मुंबईलाही सामना गमवावा लागला.

कसोटी यष्टिरक्षक वृद्धिमान साहाचेही ३५ वय झाले असून भारताने आतापासूनच उत्तम यष्टिरक्षकाचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘आयपीएल’ संपल्यावर भारताचा आंतरराष्ट्रीय क्रि के ट हंगाम सुरू होईल. स्थानिक क्रि के ट सुरू होण्याची शक्यता कमी असल्याने ‘आयपीएल’मधील कामगिरीकडेच निवड समितीला गांभीर्याने पाहावे लागणार आहे. त्यामुळे या चार प्रमुख दावेदारांपैकी भारताच्या तिन्ही संघांमध्ये यष्टिरक्षक-फलंदाजाची भूमिका कोण बजावणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

यष्टिरक्षक-फलंदाजांचे अनेक पर्याय यंदाच्या ‘आयपीएल’द्वारे भारतापुढे उपलब्ध झाले आहेत. ही खरेच कौतुकास्पद बाब आहे. परंतु राहुलवर फलंदाजीचा अधिक भार असल्याने सॅमसनला आगामी काळात भारतीय संघात यष्टिरक्षकाची भूमिका बजावताना पाहायला मला आवडेल. पंतला ज्याप्रमाणे संघ व्यवस्थापनाने अनेकदा संधी दिली. तसाच सॅमसनवरही विश्वास दर्शवावा.

– चंद्रकांत पंडित, भारताचे माजी यष्टिरक्षक फलंदाज