उत्तराखंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणाऱ्या वासिम जाफरच्या वादाप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिले आहेत. मुस्लीम क्रिकेटपटूला निवडीसाठी प्राधान्य आणि जैव-सुरक्षित वातावरणात असतानाही संघाच्या ड्रेसिंगरूममध्ये मौलवींना नमाजासाठी निमंत्रण दिल्याचे आरोप जाफरवर लावण्यात आले आहेत.
उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या (सीएयू) शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हे आदेश देण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय रावत, खजिनदार पृथ्वी सिंह नेगी, सहसचिव अवनिश वर्मा आणि कार्यकारिणी सदस्य रोहित चौहान यांचा समावेश होता. निवडीमध्ये ‘सीएयू’चे सचिव महिम वर्मा यांचा हस्तक्षेप असल्यामुळे जाफरने ८ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणाला धार्मिक वळण लागल्यानंतर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे, इरफान पठाण आणि मोहम्मद कैफ या माजी क्रिकेटपटूंनी जाफरला पाठिंबा दिला होता.
‘‘शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जाफरप्रकरणी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आम्ही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अधिकाऱ्यांना यासाठी किती वेळ लागेल, हे निश्चित करण्यात आलेले नाही,’’ असे मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार दर्शन सिंह रावत यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:31 am