करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. या लॉकडाउनचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला. सर्व भारतीय खेळाडू या काळात घरी राहत आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होते. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार गौरमांगी सिंग याने लॉकडाउन काळात आपल्या इम्फाळ येथील घरी ऑर्गेनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउन काळात स्वतःला शाररिक आणि मानसिकदृष्टीकोनातून सक्षम ठेवण्यासाठी आपल्याला याचा फायदा झाल्याचं गौरमांगीने सांगितलं, तो पीटीआयशी बोलत होता.

“माझ्या घरापासून काही मिनीटाच्या अंतरावर आमची छोटीशी जमिन आहे. तिकडे आम्ही गेल्या दोन वर्षांपासून छोटेखानी प्रमाणात भाज्या पिकवतो. मी आणि माझ्या भावडांनी गेल्या काही वर्षांमध्ये इथे वेगवेगळी पिकं घेतली आहेत. आतापर्यंत आम्ही ऑर्गेनिक पद्धतीने मिरची, हळद, मका, कारलं, भोपळा, दुधी भोपळा अश्या विविध भाज्या पिकवल्या आहेत. लॉकडाउन काळात शेतामध्ये काम करताना मला खरंच चांगला अनुभव आला. महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक गोष्टीमध्ये तुमचं मन रमत असल्यामुळे कधीही नैराश्य आलं नाही. दिवसाचे काही तास मी शेतात प्रत्येक प्रकारची काम करण्यात घालवतो.” गौरमांगी आपल्या लॉकडाउनमधील अनुभवाबद्दल बोलत होता.

भारतीय संघाचा माजी कर्णधार म्हणून खेळलेला गौरमांगी सध्या 2nd Division League स्पर्धेसाठी FC Bengaluru United संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे. सध्या लॉकडाउन काळात क्रीडा स्पर्धा बंद असल्यामुळे अनेक खेळाडूंसमोर अडचण आहे. सराव करायचा की नाही, फिटनेस कायम कसा राखायचा याबद्दल अनेकांच्या मनात द्वंद्व आहे. अशा परिस्थितीत गौरमांगी सिंगसारखा आदर्श प्रत्येक खेळाडूने घेण्यास हरकत नाही.