टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपूर्वी १८ सराव स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. जलतरण, जिम्नॅस्टिक्स, अ‍ॅथलेटिक्स, व्हॉलिबॉल यांसारख्या खेळांच्या सराव स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संयोजन समितीने स्पष्ट केले.

टोक्यो ऑलिम्पिकला पुढील वर्षी २३ जुलैपासून सुरुवात होत आहे. मात्र त्याआधी होणाऱ्या सराव स्पर्धामध्ये परदेशी खेळाडूंचा समावेश असणार की नाही हे अजून करोनाच्या स्थितीमुळे स्पष्ष्ट झालेले नाही. मात्र जलतरण, जिम्नॅस्टिक्स, डायव्हिंग आणि व्हॉलिबॉल या स्पर्धामध्ये परदेशी खेळाडूंना प्रवेश देण्याचा संयोजन समितीचा विचार आहे. सराव स्पर्धामध्ये अ‍ॅथलेटिक्समधील धावण्याची शर्यतही ९ मे रोजी नव्याने उभारण्यात आलेल्या नॅशनल स्टेडियमवर प्रस्तावित आहे.

परदेशातील पर्यटकांना या सराव स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार नसल्याचे संयोजन समितीने स्पष्ट केले. अन्य स्पर्धामध्येही जपानच्या मोजक्याच प्रेक्षकांना प्रवेश देण्यासंदर्भात विचार होऊ शकतो. जपानमध्ये नुकतीच बेसबॉलची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ३८ हजार प्रेक्षक क्षमतेच्या बेसबॉलच्या स्पर्धेत १९ हजार चाहत्यांना परवानगी देण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला टोक्यो येथे आयोजित जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतही काही हजार प्रेक्षकांना परवानगी मिळाली होती.