निरंजन बेहरा व बिपलाब समंतराय यांनी केलेली शानदार शतके तसेच त्यांची शतकी भागीदारी यामुळेच ओडिशाने रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी मिळविली. हा सामना संबळपूर येथे सुरू आहे.
महाराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या ३१५ धावांना उत्तर देताना ओडिशाने पहिल्या डावात ४४१ धावा केल्या. त्यामध्ये निरंजन बेहरा व समंतराय यांनी केलेल्या दमदार शतकांचा मोठा वाटा होता. निरंजन याने शैलीदार खेळ करीत ११ चौकारांसह १०३ धावा केल्या. समंतराय याने १०७ धावा करताना १७ वेळा चेंडू सीमापार टोलविला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. निरंजन बाद झाल्यानंतर दीपक बेहरा याने ४९ धावा करीत संघाच्या धावसंख्येस हातभार लावला. महाराष्ट्राकडून समाद फल्लाह व श्रीकांत मुंढे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
पहिल्या डावात १२६ धावांनी पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्राची दुसऱ्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. त्यांचा सलामीवीर विराग आवटे केवळ एक धाव काढून तंबूत परतला. मात्र त्यानंतर हर्षद खडीवाले (नाबाद ४३) व संग्राम अतितकर (नाबाद २४) यांनी ६६ धावांची अखंडित भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. सामन्याचा उद्या शेवटचा दिवस असून सामना वाचविण्याचीच जबाबदारी महाराष्ट्राच्या फलंदाजांवर आली आहे.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र पहिला डाव ३१५ व दुसरा डाव १ बाद ७३ (हर्षद खडीवाले खेळत आहे ४३,संग्राम अतितकर खेळत आहे २४) ओडिशा पहिला डाव- ४४१ (नटराज बेहरा ६०, निरंजन बेहरा १०३, बिपलाब समंतराय १०७, दीपक बेहरा ४९, समाद फल्लाह ३/११८, श्रीकांत मुंढे ३/११२, चिराग खुराणा २/५७)