‘ब्लेड रनर’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरियसची मैत्रीण रीव्हा स्टीनकॅम्पची हत्या केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांपेक्षा कमी अशा सदोष मनुष्यवधाच्या आरोपांखाली ऑस्कर दोषी आहे की नाही, याविषयी न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार आहे. सदोष मनुष्यवधाच्या आरोपांखाली दोषी आढळल्यास ऑस्करला दीर्घकालीन तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या निर्णयावर दक्षिण आफ्रिकेत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.
पूर्वनियोजित कट रचून ऑस्करने हत्या केली हे सर्वार्थाने स्पष्ट होत नसल्याने त्याची निर्दोष सुटका करण्यात आल्याचे न्यायाधीश थोकझिले मसिपा यांनी सांगितले. न्यायालयाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर रीव्हाचे पालक बॅरी आणि जून स्टीनकॅम्प निराश मनाने बाहेर पडले. यावेळी ऑस्कर मान खाली घालून, हात डोक्याशी धरून बसला होता. त्याची बहीण एमीने त्याला सावरले.
कृत्रिम पायांनिशी धावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ऑस्करने लंडन ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकांवर कब्जा केला. परंतु मैत्रिणीच्या हत्त्येच्या आरोपांमुळे ऑस्कर काही दिवसांतच खलनायक ठरला. समोर आलेले पुरावे, ऑस्करची अस्थिर मानसिक स्थिती यामुळेच ऑस्करच्या हातून हे कृत्य घडले असावे अशा चर्चाना ऊत आला होता. सहा महिने चाललेल्या या खटल्याला जगभरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या खटल्यामुळे ऑस्करचे खाजगी आयुष्यही जगासमोर आले. सुनावणीदरम्यान ऑस्कर अनेकदा हताशपणे रडला. या खटल्यात आरोपी असल्याने ऑस्करशी संलग्न मोठय़ा ब्रँड्सनी आपले करार रद्द केले होते.