१६ एप्रिल २०१६ ला पुढील सुनावणी
माजी पॅरालिम्पिक विजेता ऑस्कर पिस्टोरियसला मंगळवारी जामीन मिळाला. प्रेयसीच्या हत्येप्रकरणी दक्षिण आफ्रिका सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर पिस्टोरियसने जामिनासाठी अर्ज केला होता. ‘‘१६ एप्रिल २०१६ पर्यंत या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून याचिकाकर्त्यांला जामिनावर सोडण्यात येत आहे,’’ अशी माहिती प्रेटोरिया उच्च न्यायालयाचे न्यायाधीश औब्रेय लेडवाबा यांनी दिली. लेडवाबा यांनी सांगितले की, ‘‘पिस्टोरियसला घर कैदेत कायम ठेवण्यात आले आहे, परंतु तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीने तो घराबाहेर जाऊ शकतो. तसेच त्याला इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.’’
गतआठवडय़ात न्यायाधीशांनी त्याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. २०१३मध्ये रिव्हा स्टीनकॅम्प या प्रेयसीच्या हत्येप्रकरणी पिस्टोरियसला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. एका वर्षांच्या शिक्षेनंतर त्याला ऑक्टोबरमध्ये जामीन मिळाला, परंतु त्याला घर कैदेत ठेवण्यात आले होते. दरम्यान, पुढील न्यायालयीन लढाई परवडणारी नसल्याचे त्याच्या वकिलाने सांगितले आहे.