पहिल्या टप्प्यातील विजयामुळे उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक

युएफा युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेतील अंतिम ३२ संघांच्या फेरीतील दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी आर्सेनलला घरच्या मैदानावर ऑस्टरसँड्स एफकेकडून १-२ असा पराभव पाहावा लागला. मात्र पहिल्या टप्प्यातील ३-० अशा मोठय़ा विजयाच्या जोरावर त्यांनी ४-२ अशा सरासरीने अंतिम १६ संघांमध्ये धडक मारली.

ऑस्टरसँड्सच्या खेळाडूंनी चमकदार खेळ करताना सुरुवातीलाच आर्सेनलची बचावफळी भेदली. दोन मिनिटांमध्ये दोन गोल करताना त्यांनी पहिल्या सत्राच्या मध्यावरच २-० अशी आघाडी घेतली. २२व्या मिनिटाला आर्सेनलच्या कॅल्युम चेंबर्सकडून स्वयंगोल झाला. त्यानंतर ६९ सेकंदांनी ऑस्टरसँड्सनी आघाडी वाढवली. बचावपटू केन सेमाने प्रतिस्पर्धी बचाव फळीसह गोलरक्षक डेव्हिड ऑस्पिनाला सहज चकवले.

०-२ अशा पिछाडीनंतर आर्सेनल क्लब थोडा दडपणाखाली आला. मात्र मध्यतरानंतर त्यांनी खेळ उंचावला. त्याचे फलस्वरूप ४७व्या मिनिटाला कोलॅसिनॅकने उजव्या बाजूने सुरेख चाल रचताना आर्सेनलचा पहिला गोल केला.

अन्य लढतींमध्ये बोरुसिया डॉर्टमंड, अ‍ॅथलेटिक क्लब, मिलान आदी क्लबनी उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळवला. बोरुसिया डॉर्टमंड आणि अटलांटा यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीमध्ये सुटली.  रेआल सोशिडॅडचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

चाहत्यांच्या हाणामारीमध्ये पोलीस अधिकारी ठार

अ‍ॅथलेटिक बिल्बाओ आणि स्पार्टक मॉस्को यांच्यातील लढतीदरम्यान बिल्बाओमध्ये चाहत्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला प्राण गमवावे लागले. गोंधळ घालणाऱ्यांमध्ये अधिकाधिक लोक रशियाचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या हाणामारीप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.