करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे अशक्य झाल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) नाइलाजास्तव अन्य ठिकाणी ही स्पर्धा खेळवावी लागेल. परंतु सध्या तरी भारतातच विश्वचषक आयोजित करण्याला आमचे प्राधान्य आहे, असे स्पष्ट मत ‘आयसीसी’चे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अलार्डिस यांनी व्यक्त केले.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत भारतामध्ये विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. मात्र सध्या देशात करोनाचा कहर वाढत असल्याने क्रीडा क्षेत्रावरही अनेक निर्बंध आले आहेत. अशा परिस्थितीतही ‘आयपीएल’चे भारतातच प्रेक्षकांविना आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. परंतु विश्वचषकासाठी ‘आयसीसी’ ही जोखीम पत्करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

‘‘भारतातील सद्य:स्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत. विश्वचषकासाठी अद्यापही पाच ते सहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. तोपर्यंत भारतातील करोनाची स्थिती नक्कीच सुधारेल, अशी आशा आहे. परंतु काही कारणास्तव भारतात विश्वचषकाचे आयोजन करणे शक्य न झाल्यास आम्ही अन्य दोन पर्याय तयार ठेवले आहेत,’’ असे अलार्डिस म्हणाले.

‘‘भारतात होणारा विश्वचषक ‘आयसीसी’च्या दृष्टीने फार महत्त्वाचा असल्याने ही स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्यात येणार नाही. त्यामुळे आम्ही ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत आहोत. संयुक्त अरब अमिराती किंवा न्यूझीलंड यांपैकी एखाद्या ठिकाणी विश्वचषकाचे आयोजन करता येऊ शकते,’’ असेही अलार्डिस यांनी सांगितले.

गतवर्षी ‘आयपीएल’चा १३वा हंगामसुद्धा अमिरातीतच झाला. त्याशिवाय न्यूझीलंडमध्ये अन्य देशांच्या तुलनेत फार कमी करोना रुग्णसंख्या असल्याने ‘आयसीसी’ या दोन पर्यायांचा विचार करत आहे.

‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेची १६ एप्रिलला बैठक

नवी दिल्ली : अनधिकृतपणे आयोजित करण्यात येणाऱ्या स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धा तसेच देशांतर्गत ट्वेन्टी-२० स्पर्धांमध्ये होणाऱ्या गैरवर्तनाला आळा घालण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विशेष समिती स्थापन करणार आहे. यासंबंधीच निर्णय १६ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त भारतीय महिला क्रिकेट संघाचे साहाय्यक प्रशिक्षक तसेच संघ व्यवस्थापनातील अन्य सदस्यांची नेमणूक या बैठकीत करण्यात येईल. त्याशिवाय ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि पुढील वर्षाच्या स्थानिक हंगामाची रूपरेषाही या बैठकीदरम्यान आखली जाईल. यंदा करोनामुळे रणजी करंडक रद्द करून मुश्ताक अली आणि विजय हजारे करंडक या मर्यादित षटकांच्या स्पर्धांना प्राधान्य देण्यात आले. त्याशिवाय सध्या देशातील वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.