एका वर्षांने पुढे ढकलण्यात आलेली टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा २०२१मध्ये खेळवण्यात येईल; अन्यथा जगातील सर्वात प्रतिष्ठेची ही स्पर्धा रद्द करावी लागेल, असे मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) समन्वयक समितीचे अध्यक्ष पाएरे-ऑलिव्हियर बेकर्स यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, ‘‘पुढील वर्षी २३ जुलैपासून टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होईल, असा ठाम विश्वास आहे. मात्र त्यापुढे ही स्पर्धा पुढे ढकलणे शक्य होणार नाही. प्रत्येक जण पुढील वर्षी ही स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहे. पण २०२१मध्येही ही स्पर्धा घेणे जमले नाही तर ती रद्द करावी लागेल.’’

‘‘संयोजन समितीत हजारो लोकांचा समावेश असल्यामुळे तसेच वर्षभराने स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे खर्च मोठय़ा प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळापर्यंत ही स्पर्धा लांबवण्याचा विचार करता येणार नाही. करोनामुळे अन्य स्पर्धाचे वेळापत्रकही बिघडले आहे. सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांनी टोक्यो ऑलिम्पिक २०२१मध्ये खेळवण्याला मंजुरी दिली आहे. मात्र दुसऱ्यांदा ही स्पर्धा लांबणीवर टाकता येणार नाही,’’ असेही ६० वर्षीय पाएरे-ऑलिव्हियर यांनी सांगितले.