विंडीजविरुद्ध दुसरा वन-डे सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारतीय संघाला विंडीजच्या फलंदाजीचा खऱ्या अर्थाने अनुभव आला. यानंतर बीसीसीआयने भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या आपल्या ठेवणीतल्या अस्त्रांना बाहेर काढत, उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघात जागा दिली. हेटमायर, होप, होल्डर या तिन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. भारताने आपल्या प्रमुख गोलंदाजांना संघात स्थान देणं, याचाच अर्थ त्यांना आमची दखल घ्यावी लागली आहे असं वक्तव्य विंडीजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी केलं आहे.

“पहिल्या दोन सामन्यांमध्ये आमच्या फलंदाजांनी ज्या प्रकारे खेळ केला आहे, तो पाहूनच भारताने आपल्या प्रमुख गोलंदाजांना संघात स्थान दिलं आहे. आम्ही भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला, आणि भारताला चांगली लढत दिली. एका प्रकारे हे आमचं यशच आहे. आमच्या संघाला सुधारण्यासाठी बराच वाव आहे, मात्र तरीही आम्ही भारताला आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे.” स्टुअर्ट लॉ यांनी विंडीजच्या संघाचं कौतुक केलं.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये शाई होप, हेटमायर, जेसन होल्डर यांनी भारतीय गोलंदाजांच्या चांगलेच नाकीनऊ आणले. तिसऱ्या सामन्यातही विंडीजच्या फलंदाजांनी खराब सुरुवात करुनही भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. सध्या भारत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० असा आघाडीवर आहे.