वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये ३२१ धावांचा डोंगर उभारला असला तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांची पाठराखण केली आहे. खेळपट्टी ही फलंदाजीसाठी पोषक होती. खेळपट्टीवर फिरकीलाही जास्त मदत मिळत नव्हती. भुवनेश्वर कुमारचा अपवाद वगळला तर अन्य गोलंदाजांनी जास्त धावा दिल्या. या खेळपट्टीवर ३२० धावा पाहता गोलंदाजांनी वाईट कामगिरी केली नाही, असे धोनीने सांगितले.
‘‘अखेरच्या षटकांमध्ये भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या षटकांमध्ये त्यांच्याकडून सातत्याने चांगली कामगिरी होत आहे. त्यामुळे गोलंदाजांना मी दोष देऊ इच्छित नाही,’’ असे धोनीने सांगितले.
भारताच्या फलंदाजीचे विश्लेषण करताना धोनी म्हणाला की, ‘‘मोठय़ा धावसंख्येचे आव्हान पेलण्यासाठी आम्हाला चांगल्या सलामीची आवश्यकता होती. आमची सुरुवात चांगली झाली, परंतु अजिंक्य रहाणे धावचीत झाल्यावर ठराविक अंतराने आमचे फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे महत्त्वाच्या भागीदाऱ्या झाल्या नाहीत.’’