इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि ५४ धावांनी मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीची निर्भर्त्सना केली. पहिल्या दिवशी फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारताची ४ बाद ८ धावा अशी दयनीय अवस्था झाली आणि मग फक्त १५२ धावांत भारताचा डाव कोसळला, त्याच वेळी भारताचा पराभव निश्चित झाला होता, अशा शब्दांत धोनीने कडाडून टीका केली.
‘‘आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी धावफलकावर पुरेशा धावा झळकावणे महत्त्वाचे असते. ७, ८, ९, १० आणि ११ क्रमांकांच्या फलंदाजांनीच आतापर्यंत मालिकेत चांगली फलंदाजी केल्याचे दिसून येते,’’ असे धोनीने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
‘‘आघाडीच्या फळीतील फलंदाजांची वाईट कामगिरी लॉर्ड्सवरील विजयाने झाकली गेली. त्यामुळे आम्ही त्यांना तुम्ही धावा का करू शकला नाहीत, हे विचारू शकलो नाही. आघाडीच्या फळीतील फलंदाजांपेक्षा आमच्या पाचव्या गोलंदाजाने अधिक धावा केल्या,’’ असे धोनीने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘या खेळपट्टीवर इंग्लंडने चांगली गोलंदाजी केली. सामन्याचा पहिला तास अतिशय महत्त्वाचा होता. भारताच्या फलंदाजांनी सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे. आघाडीच्या पाच ते सहा फलंदाजांनी अधिक धावा करण्याची गरज आहे. या पराभवाने आम्ही दुखावलो आहोत.’’
‘‘भारतीय उपखंडाबाहेर खेळताना पहिला डाव अधिक महत्त्वाचा असतो. मागील दोन कसोटी सामन्यांत भारताचा पहिला डाव गडगडला. या कठीण परिस्थितीतून सावरणे, मग खूप कठीण जाते. पहिल्या डावात आपण कसे खेळलो, याचे आत्मपरीक्षण केल्यानंतरच पुढच्या सामन्याचा विचार करता येईल. पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या दोन तासांत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी टिकाव धरण्यासाठी याची आवश्यकता आहे,’’ असे धोनीने सांगितले.