न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रहाणे याने एकदिवसीय सामन्यांसाठी देखील आमची भूमिका ही आक्रमकच राहणार असल्याचे सांगितले. कसोटी क्रिकेटमध्ये शिस्त हा भारतीय संघाचा महत्त्वाचा दूवा होता. कसोटी क्रिकेटमध्येही आमचा नेहमी आक्रमक पवित्रा राहिला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्येही संघ आक्रमक भूमिकेतच पाहायला मिळेल, असे रहाणे म्हणाला. संघाची ताकद आणि क्षमता लक्षात घेऊनच प्रत्येक जण आपली भूमिका व्यवस्थित पार पाडेल, असा विश्वासही रहाणेने यावेळी व्यक्त केला. संघातील आपल्या फलंदाजी क्रमवारीवरही रहाणेने भाष्य केले. खरं सांगायचं तर मला अजूनही मी संघात कोणत्या स्थानी फलंदाजी करणार हे माहित नाही. सराव शिबीर पार पडल्यानंतर ते स्पष्ट होईल. पण या मालिकेसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. कसोटी मालिकेत संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि विजयाची मालिका अशीच कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. कसोटी मालिका विजयाचा आत्मविश्वास संघातील खेळाडूंच्या गाठीशी असल्याने चांगला खेळ पाहायला मिळेल, असेही तो पुढे म्हणाला. संघात माझी जी भूमिका असेल ती मी चोख बजावण्यासाठी तत्पर असेन, चांगला धावा करुन संघाला विजय प्राप्त करून देणे हेच माझे उद्दीष्ट राहील. कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून मला बरंच काही शिकायला मिळालं. संघात ज्येष्ठ किंवा कनिष्ठ असा कोणताही प्रकार नाही. आम्ही सर्व समान आहोत. मी प्रत्येक पायरीवर शिकणारा खेळाडू आहे. प्रत्येक सामना मला काहीतरी नवीन अनुभव देणारा ठरतो. त्यामुळे या मालिकेतूनही बरंच काही शिकायला मिळेल, अशी आशा देखील रहाणेने व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 7:46 pm