भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून अॅडलेडच्या मैदानावर सुरुवात होते आहे. या दोन्ही देशांमधली क्रिकेट मालिका ही नेहमी शाब्दीक चकमक व इतर घडामोडींसाठीही नेहमी लक्षात राहते. यंदाही ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाच्या कर्णधाराला आपलं लक्ष्य करण्याचं ठरवलं आहे. कांगारुंचा कर्णधार टीम पेनने, आमच्या गोलंदाजांकडे विराटला बाद करण्याची क्षमता असल्याचं वक्तव्य करत, भारताला ही मालिका सोपी जाणार नसल्याचं सांगितलं आहे.

अवश्य वाचा – ….आणि विराट कोहली हसला

“आमची जलदगती गोलंदाजी ही सर्वोत्तम आहे. जर आमचे गोलंदाज ठरवलेल्या रणनितीनुसार खेळले तर ते विराटला नक्कीच बाद करु शकतात.” पेन क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणाचा ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला होता. यानंतर भारताविरुद्ध खेळताना असा कोणताही प्रकार होणार नाही याची काळजी घ्या अशी तंबी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंनी दिली आहे.

अवश्य वाचा – विराट भारताला 2019 विश्वचषक जिंकवून देऊ शकतो – डॅरेन सॅमी

विराट हा आताच्या घडीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. माझ्यासकट अनेक खेळाडू त्याचा मैदानातला खेळ पाहण्यासाठी उत्सुक असतात. मात्र या मालिकेत त्याला बाद करण्यासाठी आम्ही प्रत्येक मार्ग अवलंबणार आहोत. टीम पेन विराटच्या फलंदाजीबद्दल बोलत होता. भारतासाठी पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ ला झालेली दुखापत आणि तो संघात न खेळू शकणं ही मोठी चिंतेची बाब ठरु शकते. त्यामुळे पहिल्या कसोटीत कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.