ला लिगा फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना क्लबने आणखी एका खेळाडूला रेकॉर्डब्रेक ट्रान्सफर अमाऊंट देऊन आपल्या क्लबमध्ये दाखल करुन घेतलं आहे. फ्रान्सच्या २० वर्षीय औस्मन डेम्बेले या खेळाडूसाठी बार्सिलोनाने तब्बल १३५.५ पाऊंड एवढी रक्कम मोजली आहे. डोर्डमंट क्लबकडून बार्सिलोनाने पुढील ५ वर्षांसाठी औस्मन डेम्बेलेला एवढी मोठी रक्कम मोजली आहे. नुकतच या संदर्भात दोन्ही क्लबच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

डेम्बलेसाठी बार्सिलोनाने केलेला करार हा ला लिगा स्पर्धेच्या इतिहासात दुसरा सर्वात मोठा करार मानला जातो आहे. याआधी प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारसाठी २०० पाऊंड इतकी किंमत मोजण्यात आली होती.

यावेळी डेम्बलेनेही आपल्या चाहत्यांचे आभार मानले. ” मी आज खूप आनंदी आहे. बार्सिलोनाकडून खेळणं हे माझं आतापर्यंतचं स्वप्न होतं, आणि आज माझं हे स्वप्न अखेर पूर्ण होतंय. बार्सिलोना हा जगातील सर्वात चांगला क्लब आहे”, असं म्हणत डेम्बलेने आपल्या नवीन संघातील समावेशाबद्दल आनंद व्यक्त केला. डोर्टमंड संघाकडून खेळताना डेम्बलेने ५ ऑगस्ट रोजी जर्मन सुपर कप स्पर्धेत आपला शेवटचा सामना खेळला होता.

यावेळी नेमारच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचं ट्रान्सफर डिल झाल्याबद्दल विचारलं असता डेम्बले म्हणाला, “नेमार आणि माझ्यात तुलना करणं चुकीचं ठरेल. मी गेल्या दोन वर्षांपासून आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये फुटबॉल खेळायला लागलो आहे. नेमार हा जगातला सर्वोत्तम फुटबॉलपटू आहे. मी अजुनही तरुण आहे आणि प्रत्येक दिवस माझ्यात सुधारणा व्हावी यासाठी मी दिवसेंदिवस प्रयत्न करतोय.”

नेमारच्या जागी फुटबॉल खेळायचंय या गोष्टीचा सध्या मी विचारच करत नाहीये. सध्या माझ्यावर संघाने जी जबाबदारी टाकली आहे, ती पूर्ण करण्याकडे माझा कल असणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये डेम्बले कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.