न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला शनिवारी Mount Maunganui येथे सुरुवात झाली. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानी संघाने पहिल्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडच्या संघाला ३ बाद २२२ वर रोखलं. कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर आणि हेन्री निकोल्स यांच्या चिवट खेळापुढे पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अखेरच्या सत्रात शरणागती पत्करली.

टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल हे सलामीवीर शाहीन आफ्रिदीच्या माऱ्यासमोर स्वस्तात माघारी परतले. यानंतर विल्यमसन आणि टेलर यांनी आपल्या अनुभवाला साजेसा खेळ करत संघाचा डाव सावरला. शाहीन आफ्रिदीने टेलरला ७० धावांवर बाद करत पुन्हा एकदा न्यूझीलंडला धक्का दिला. मात्र यानंतर मैदानावर आलेल्या हेन्री निकोल्सनेही तितकाच चिवट खेळ करत पाकिस्तानी गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शहा निकोल्सला गोलंदाजी करताना इतका कंटाळला की वैतागून त्याच्या तोंडातून आऊट हो जा भूतनी के…असे शब्द बाहेर पडले. पाहा हा व्हिडीओ…

रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. टेलर १५१ चेंडूत १० चौकार आणि १ षटकार लगावत ७० धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार विल्यमसनने निकोल्ससोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विल्यमसन नाबाद ९५ तर निकोल्स नाबाद ४२ धावांवर खेळत होता.