21 August 2019

News Flash

संघात निवड करायची की नाही, तुम्हीच ठरवा ! धोनीकडून चेंडू निवड समितीच्या कोर्टात

धोनीची विंडीज दौऱ्यासाठी संघात निवड नाही

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरु झाली आहे. अद्याप धोनीने निवृत्तीविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात मात्र आपण खेळणार नसल्याचं धोनीने निवड समितीला कळवलं आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर धोनीला संघात निवडायचं की नाही हा निर्णय निवड समितीनेच घ्यावा, असा संदेश धोनीने निवड समितीला दिलेला आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुथ एम.एस.के. प्रसाद आणि धोनी यांच्यात रविवारी अनौपचारिक चर्चा झाल्याचं कळतंय. या चर्चेत प्रसाद यांनी आगामी काळात निवड समिती तरुण खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत असल्याचं धोनीला सांगितलं, आणि यानंतरच आगामी काळात मर्यादीत षटकांच्या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून धोनी पहिली पसंती नसेल असं ठरवण्यात आलं. बीसीसीआय आता ऋषभ पंतला अधिकाधीक सामने खेळायला देण्याच्या तयारीत आहे. २०२३ साली आगामी वन-डे विश्वचषक खेळवला जाणार आहे. तोपर्यंत धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल याची शक्यता कमीच आहे. मात्र २०२० साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठीही निवड समिती धोनीचा विचार करेल याची खात्री देता येत नसल्याचं कळतंय.

“जरीही धोनीने दोन महिन्यांनी पुनरागमन केलं, तरी त्याचा फिटनेस कसा तपासायचा? धोनी स्थानिक क्रिकेट खेळत नाही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तो फक्त मर्यादीत षटकांच्या सामन्यात खेळतो. त्यामुळे निवड समितीने संघ निवडीदरम्यान धोनीचा विचार न करण्याचं ठरवलं आहे. धोनीनेही, दोन महिन्यांनंतर आपली संघात निवड करायची की नाही याचा निर्णय निवड समितीवर सोपवला आहे.” बीसीसीआयच्या सुत्राने इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली.

२२ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयची निवडणुक पार पडणार आहे. या निवडणुकीनंतर सध्याची निवड समिती कार्यान्वित राहिल की नाही याबद्दलचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीबद्दल आताच काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं बीसीसीआयच्या सुत्राने सांगितलं. रवीवारी संघाची घोषणा करताना निवड समिती प्रमुख एम.एस.के प्रसाद यांनी धोनीसारख्या महान खेळाडूला निवृत्ती कधी घ्यायची याची पूर्ण कल्पना असते असं वक्तव्य केलं होतं.

First Published on July 22, 2019 4:14 pm

Web Title: out of west indies tour dhoni leaves future in hands of selection committee psd 91
टॅग Bcci,Ms Dhoni