भारताचे आव्हान संपुष्टात

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे पावणेदोन लाख पारितोषिक रकमेच्या जपान खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
टोकियो मेट्रोपोलिटिन जिम्नॅशियम स्टेडियमवर झालेल्या लढतीत चायनीज तैपेईच्या सहाव्या मानांकित चोऊ टीन चेनने जागतिक क्रमवारीतील आठव्या स्थानावरील कश्यपचा ४२ मिनिटांत २१-१४, २१-१८ असा पराभव केला.
सायना नेहवाल, के. श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांची वाटचाल दुसऱ्या फेरीत खंडित झाल्यानंतर भारताची मदार फक्त कश्यपवर होती.
पहिल्या गेममध्ये चेनने सुरुवातील ५-२ अशी आघाडी घेतली होती. परंतु कश्यपने त्याला ८-८ असे बरोबरीत गाठले. पण त्यानंतर कश्यपला तोलामोलाची लढत देता आली नाही. दुसऱ्या गेममध्ये कश्यपने चांगली लढत देताना ४-२ अशी आघाडी घेतली. पण चेनने सलग सहा गुण घेत ८-४ अशी आगेकूच केली. अखेपर्यंत कश्यपने चेनला झुंजवले. परंतु चेनने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
‘‘मी माझा सर्वोत्तम खेळ दाखवण्यात अपयशी ठरलो. माझे काही फटके चुकीचे ठरले आणि त्याचाच फटका मला बसला. दुसऱ्या गेममध्ये शेवटी मला सूर गवसला. परंतु चेनचा खेळ माझ्यापेक्षा चांगला होता,’’ असे कश्यपने सामन्यानंतर सांगितले.