पी. कश्यप आणि समीर वर्मा या भारतीय बॅडमिंटनपटूंनी ऑर्लिन्स खुल्या वर्ल्ड सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मागील महिन्यात ऑस्ट्रियन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या पाचव्या मानांकित कश्यपने उपउपांत्यपूर्व फेरीत आर्यलडच्या जोशूआ मॅगीवर २१-११, २१-१४  असा विजय मिळवला. दुसरीकडे स्विस खुल्या स्पर्धेतील विजेता आणि अव्वल मानांकित समीर वर्मा यानेही स्थानिक खेळाडू थॉमस रॉक्सेलचा २१-१६, २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला.

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कश्यप पुढील फेरीत तिसऱ्या मानांकित डेन्मार्कच्या सॅस्मूस जीम्केचा, तर समीर स्थानिक खेळाडू लुकास कोव्‍‌र्हीचा सामना करेल. मिश्र दुहेरीत फ्रान्सिस अ‍ॅल्वीन आणि के. नंदगोपाळ या भारतीय जोडीने पोलंडच्या मिलॉस बोचॅट आणि अ‍ॅडम सीवालीनवर १५-२१, २१-१७, २१-१७ असा विजय मिळवला. त्यांना पुढील फेरीत तिसऱ्या मानांकित जर्मनीच्या मार्क लॅम्सफुस आणि माव्‍‌र्हिन एमिल यांचा सामना करावा लागेल.

पुरुष एकेरीत आर. एम. व्ही. गुरुसाईदत्तला संघर्षपूर्ण लढतीत पराभव पत्करावा लागला. २०१५च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या जॅन ओ जॉर्जीन्सेनकडून त्याला २२-२०, १७-२१, २१-१७ अशी हार मानावी लागली. महिला एकेरीत इंडोनेशियाच्या जॉर्जिया मॅरिस्का तुजुंगने २१-११, २१-९ अशा फरकाने भारताच्या मुग्धा आग्रेचे आव्हान संपुष्टात आणले.